तुमच्यासमोर एका लहान मुलाचा जीव वाचवायचा की प्राण्याचा ? असा प्रश्न पडला असेल तर काय कराल.. तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे. पण हेच धर्मसंकट अमेरिकेतील ओहाओ प्राणी संग्रहालयामधील कर्मचा-यांसमोर उभं राहिल होतं, जेव्हा 4 वर्षाचा चिमुरडा गोरिलासमोर पडला. गोरिलासमोर पडलेल्या या चिमुरड्याला वाचवण्यासाठी कर्मचा-यांना गोरिलाला ठार मारावं लागलं.
अमेरिकेतील ओहाओ प्राणी संग्रहालयात हा चिमुरडा आपल्या आईसोबत आला होता. त्यावेळी तो गोरिलासमोर पडला. तब्बल 10 मिनिटे हा चिमुरडा गोरिलासमोर होता. घटनेनंतर लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. मात्र पाहण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी तात्काळ पोहोचले आणि या परिस्थितीत गोरिलाला मारण्याचा कठीण निर्णय त्यांना घ्यावा लागला.
मुलाला वाचवण्यासाठी प्राणी संग्रहालयाच्या वतीने अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र लोकांच्या गोंधळामुळे आणि वारंवार त्रास दिल्याने गोरिला भडकण्याची भीती होती. ज्यामुळे मुलाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता. शेवटी गोरिलाला ठार करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोरिलाला ठार करुन मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. मुलाला शरिरावर काही ठिकाणी जखमा झाल्या असून रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे.