ठाण्याच्या साकेत पुलाची डागडुजी शनिवारपासून सुरू असल्याने नाशिककडून ठाण्याकडे येणा-या आणि ठाण्यातून नाशिकच्या दिशेने जाणा-या दोन्ही मार्गावर वाहतुकीचा बो-या वाजला आहे. सुट्टीच्या दिवशी वाहनांची वर्दळ वाढल्याने शनिवारी साडेपाच तास त्यानंतर रविवारी सायंकाळपासून या मार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली.
मुंबई-नाशिक महामार्गावर ठाण्यातून नाशिकच्या दिशेने बाहेर पडताना खाडी ओलांडण्यासाठी साकेत पुलावरून जावे लागते. १९७२ साली उभारलेल्या या पुलाला सात जोड असून त्यावर डांबराचा मोठा थर आहे.
या जोडाची डागडुजी करणे आणि पुलावरील डांबराचा थर कमी करण्यासाठी शनिवारपासून या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र नाशिककडे जाताना व ठाण्याकडे येताना हा मुख्य रस्ता असल्याने आणि पुढे हाच रस्ता पूर्व द्र्रुतगती मार्गात परावर्तित होत असल्याने या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते.
एकटया साकेत पुलावरून दिवसाला सुमारे ५० हजारांच्या जवळपास गाडय़ांची वाहतूक होते. यामुळे या पुलाचे काम सुरू करताना वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.
मात्र प्रत्यक्षात पर्यायी मार्गाहून जाताना या मार्गावर गाडय़ांची प्रचंड कोंडी झाली. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता कामाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच या मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती. त्यानंतर रविवार उजाडला तोही वाहतूक कोंडीचाच. यावेळी वाहतूक लाईनवर आणण्यासाठी वाहतूक पोलीसही नसल्याचे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
याबाबत वाहतूक विभागाच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांना विचारले असता, ‘आम्ही वाहनचालकांना आवाहन केले होते. मात्र काही बेशिस्त चालकांमुळे ही कोंडी झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय वाहतूक पोलीसही ही कोंडी सोडवण्यासाठी कार्यरत आहेत. मात्र त्यांची संख्या कमी असल्याचे त्यांनी मान्य केले.
