आंबोलीचा वीरपुत्र काश्मीरमध्ये शहीद

लान्सनायक पांडुरंग महादेव गावडे (३२) यांना कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आल्याचे वृत्त पोहोचताच गावडे कुटुंबीयांसह त्यांच्या आंबोली-मुळवंदवाडी गावावर रविवारी शोककळा पसरली.

गावडे यांच्या आई-वडिलांना मुलाच्या निधनाचा मोठा धक्का बसला असून, त्यांची प्रकृतीही खालावली आहे. देशाची सेवा करताना वीरगती प्राप्त झालेल्या शहीद पांडुरंग यांचे दोन भाऊही देशसेवेत आहेत.

पांडुरंग यांचा मृतदेह सोमवारी सायंकाळपर्यंत आंबोली येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचेल. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. श्रीनगर-कुपवाडा येथे कंपनी कमांडर म्हणून कार्यरत असलेले लान्सनायक पांडुरंग गावडे हे जलद कार्यवाही पथकात कार्यरत होते.

गेल्या तीन दिवसांपासून कुपवाडा येथे भारतीय लष्कराचे जवान व दहशतवाद्यांत चकमक सुरू होती. त्यावेळी शत्रूशी दोन हात करताना पांडुरंग यांना युनिटजवळ झालेल्या स्प्लेंडर स्फोटात डोक्याला व पायाला जबर दुखापत झाली होती. पांडुरंग हे दीड वर्षापासून ‘मराठा लाईट इन्फंट्री’तून कुपवाडा येथे कार्यरत होते.

पांडुरंग गावडे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण आंबोलीत झाले. पुढील शिक्षण त्यांनी सावंतवाडीत घेतले होते. अभ्यासाबरोबर खेळातही ते तरबेज असल्याने अष्टपैलू विद्यार्थी म्हणून ते सुपरिचित होते.

लष्करात भरती झाल्यानंतरही गावातील धार्मिक, सामाजिक कार्यात ते हिरिरीने सहभाग घेत असत. सतत हसतमुख चेहरा व सहकार्याच्या भावनेने समाजात ते वावरत असल्याने त्यांचे हे वीरमरण सर्वानाच चटका लावून गेले आहे.

दोन भाऊही सैन्यात पांडुरंग हे २००१मध्ये बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्रीमधून भारतीय सैन्यात दाखल झाले होते. ते चांगले फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉलपटू होते.  त्यांना रेडिओ ऑपरेटर युनिटचे पारितोषिकही मिळाले होते.

गेली दोन वर्षे ते ४१ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. पांडूरंग यांच्यामागे दोन भाऊ, पत्नी, दोन मुलगे, तीन बहिणी असे कुटुंब आहे. पांडूरंग यांचे दोन्ही मोठे भाऊ सैन्य दलातच सेवा बजावत आहेत. यापैकी गणपत महादेव गावडे हे सध्या धुळे येथे एनसीसीमधून सैन्यात कार्यरत आहेत.

शहीद पांडूरंग यांची पत्नी प्रांजलवर जणू आभाळ कोसळले आहे. पांडूरंग यांना एक पाच वर्षाचा व चार महिन्यांचा मुलगा आहे. फेब्रुवारीत ते एका महिन्याच्या रजेवर गावी आले होते.

याचवेळी मोठया मुलाचा वाढदिवस व छोटया मुलाचा नामकरण सोहळाही त्यांनी साजरा केला होता. हे वृत्त समजताच पालकमंत्री दीपक केसरकर, तहसीलदार सतीश कदम, नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गावडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

खुशालीचा रात्रीचा फोन अखेरचा ठरला!

श्रीनगर येथे कर्तव्य बजावताना पांडूरंग यांनी शनिवारी रात्री माजी सैनिक असलेल्या त्यांच्या ज्येष्ठ बंधूला फोन केला होता. सर्वाची खुशाली त्यांनी विचारली. हेच त्यांचे कुटुंबीयांशी शेवटचे संभाषण ठरले.

आपण सुखरूप आहोत. काळजी नसावी. घरच्यांची काळजी घ्या, असा संवाद त्यांनी साधला होता. त्याच रात्री अचानक दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली आणि गावडे गंभीर जखमी झाले. या कालगतीमुळे सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *