पलूस, मिरज वगळता सांगलीत टँकरने पाणी!

सांगली जिल्ह्यातील पाणीसाठा घटत आहे. टंचाई गंभीर होत आहे. मध्यम प्रकल्पांत अवघा दोन टक्के पाणीसाठा शिल्लक असून कोयना, चांदोली धरणाच्या जलाशयातील पाणीसाठाही घटला आहे.

येत्या पंधरवडयात वळवाच्या पावसाने हात दिला नाही तर पाण्याची स्थिती आणखी भीषण होण्याचा धोका आहे. सध्या १७० गावांत १५६ टँकरने पाणी दिले जात आहे.

दुष्काळाची तीव्रता वाढल्याने पलूस, मिरज वगळता सर्व तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जत तालुक्यात ७८ गावे आणि ६४० वाडयांना ८६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माडग्याळ येथे छावणी सुरू करण्यास मान्यता दिली आहे, मात्र जनावरांची संख्या अजून अपेक्षित एवढी वाढलेली नाही. खरिपाची ३६३ गावे दुष्काळी म्हणून जाहीर केल्यानंतर आता सरकार काय लाभ देणार, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील ८४ प्रकल्पांतील पाणीसाठाही वेगाने घटत आहे. यात पाच मध्यम प्रकल्पांत केवळ दोन टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही तीन तलाव कोरडे पडले आहेत. दोनच तलावात ब-यापैकी पाणीसाठा आहे.

जत तालुक्यातील बसाप्पावाडी तलावात १.०६ दशलक्ष घनमीटर, तर मोरणा तलावात ०.८१ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा आहे. सिद्धेवाडी, दोड्डनाला आणि संख तलावात पाणी शिल्लक नाही. ७९ मध्यम प्रकल्पांत केवळ १३ टक्के पाणी आहे. हा साठा अजून पंधरवडयापर्यंत पुरेल, असा अंदाज आहे; मात्र त्यानंतरची अवस्था भीषण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *