आयपीएलसारख्या टी-२० लीगमध्ये गोलंदाजांना फारच कमी वाव असतो. नववी आवृत्तीही त्याला अपवाद नाही. गोलंदाजांची कामगिरी दखल घेण्यासारखी नसली तरी भारताच्या तुलनेत परदेशी गोलंदाजांनी वर्चस्व राखले आहे. अव्वल पाचमध्ये एक मात्र ‘टॉप टेन’मध्ये भारताचे तब्बल सहा गोलंदाज आहेत.
प्रत्येक सामन्यात सरासरी एक विकेट
यंदाच्या हंगामाचा विचार करता गोलंदाजांना फार मोठे यश मिळवता आलेले नाही. प्रत्येक सामन्यामागे एक विकेट हीच जवळपास प्रत्येकाची सरासरी आहे. मुंबई इंडियन्सचा मध्यमगती गोलंदाज मिचेल मॅकक्लेनॅघनने सर्वाधिक म्हणजे १३ सामन्यांत १७ विकेट टिपल्यात. दुस-या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा भुवनेश्वर कुमार (१२ सामन्यांत १६ विकेट) आहे. तिसऱ्या क्रमांकावरील कोलकात्याच्या आंद्रे रसेलच्या खात्यात १२ सामन्यांत १५ विकेट आहेत.
चौथ्या आणि पाचव्या स्थानी असलेल्या अनुक्रमे मुस्तफिझुर रहमान (हैदराबाद) आणि शेन वॉटसनने (बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स) प्रत्येकी १४ विकेट घेतल्यात. सहाव्या ते दहाव्या क्रमांकावर सर्वच भारताचे गोलंदाज आहेत. त्यात मुंबईचा मध्यमगती गोलंदाज जसप्रीत बुमरा (१२ सामन्यांत १४ विकेट), दिल्ली डेअडेव्हिल्सचा लेगस्पिनर अमित मिश्रा (११ सामन्यांत १३ विकेट), किंग्ज इलेवन पंजाबचा मध्यमगती संदीप शर्मा (१२ सामन्यांत १३ विकेट), बंगळूरुचा युझवेंद्र चहल (९ सामन्यांत १२ विकेट ) तसेच पंजाबच्या मोहित शर्माचा (१२ सामन्यांत १२ विकेट ) समावेश आहे.
मध्यमगती गोलंदाजांनी छाप पाडली
नवव्या मोसमातील गोलंदाजांची कामगिरी पाहिल्यास मध्यमगती गोलंदाजांनी छाप पाडली. अव्वल दहामध्ये अमित मिश्राच्या रूपाने केवळ एकमेव ‘स्पिनर’ आहे. भारतातील खेळपट्टय़ा फिरकी गोलंदाजांना अनुकूल असतात. मात्र ऑफस्पिनर आर. अश्विनसह (रायझिंग पुणे सुपरजायंट्स), हरभजन सिंग (मुंबई इंडियन्स) आणि डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा सपशेल अपयशी ठरलेत. दिल्लीचा लेगस्पिनर अमित मिश्राने फिरकीपटूंची थोडी फार लाज राखली आहे.