उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एका पत्रकाराला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. जगेंद्र सिंह असं या पत्रकाराचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे जगेंद्र सिंह यांनी उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री राम मूर्ती यांच्याविरोधात फेसबुकवर प्रतिक्रिया पोस्ट केली होती. त्यानंतर जगेंद्र सिंह यांची जाळू हत्या झाल्याने, मंत्री राम मूर्तींवर संशय आहे.
जगेंद्र सिंह यांना पोलिसांनीच जाळलं आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असा दावा सिंह यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
जगेंद्र सिंह यांनी अवैध खाण, जबरदस्तीनं जमीन लुबाडल्याप्रकरणी फेसबुकवर लिहिले होतं. यामुळे राम मूर्ती यांना राग आला होता. जगेंद्र यांना विविध प्रकरणांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
जगेंद्र यांना पोलिसांनीच जाळून मारलं, असा दावा प्रत्यक्षदक्षींनी केला आहे. मात्र जगेंद्र सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल होता. आम्ही त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या केली असा दावा यूपीच्या पोलिसांनी केला आहे.
