सोलापूर प्राणी संग्रहालयातून मगरीची 7 पिल्लं गायब

सोलापूर प्राणी संग्रहालयातून मगरीची 7 पिल्लं गायब

सोलापूर प्राणी संग्रहालयातून मगरीची तब्बल 7 पिल्लं गायब झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्राणी संग्रहालयातीलच एका कर्मचाऱ्यांनं याचा पर्दाफाश केला आहे.

त्यामुळं महात्मा गांधी प्राणी  संग्रहालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच प्राणी संग्रहालयातून एक मगर गायब झाली होती. वन विभाग आणि महापालिकेने शोध घेऊनही या मगरीचा शोध लागला नव्हता.  मात्र ही मगर नागरी वस्तीत आढळल्यानं एकच गोंधळ उडाला होता.आता पुन्हा एकदा मगरीची 7 पिल्लं गायब झाली आहेत.

दहा दिवसापूर्वी एका मगरीने 8 पिलांना जन्म दिला होता. त्यातली 7 पिल्ल गायब झाली आहेत. प्राणी संग्रहालयाचा कर्मचारी हनुमंत वाघमारे यांनीच या घटनेचा खुलासा केला.

मगरींची संख्या वाढल्याने अधिकाऱ्यांनीच ती इतरत्र सोडली असावी असावीत असा संशय आहे.  कारण मोठ्या संख्येने असलेल्या या पिलांना सांभाळण्याची व्यवस्था प्राणी संग्रहालयात नाही. अधिकारी मात्र असं काही झालंच नसल्याचा  दावा करत आहेत. पण मगरींची नेमकी संख्या किती हे मात्र खुद्द अधिकाऱ्यांनाही सांगता येत नाही.

सात नोव्हेंबर 2013 रोजी हुडको परिसरात एकच खळबळ उडाली होती. गटारीच्या नाल्यात आणि घराजवळच्या ओढ्यात मगरींच वास्तव्य दिसून आलं होतं. जवळपास महिनाभर शहरात मगरींच्या वास्तव्याने भीतीचं वातावरण पसरलं होतं.  यामुळे पुन्हा एकदा भीतीची भावना निर्माण झाली. महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात असलेला पिंजरा आणि मगरींची संख्या याचा ताळमेळ बसत नाही.  संख्या जास्त आणि जागा कमी यामुळे मगरी सुरक्षित नसल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.

मगरीची ही सात पिल्लं गेली कुठे हा प्रश्न आहे. यासाठी प्राणी संग्रहालयातल्या लोकांनी शोधाशोध केली. पिंजरा पालथा घातला, पाण्याचा हौद रिकामा केला. पण मगरीची  पिल्लं काही मिळून आली नाहीत. ही पिल्लं प्राणी संग्रहालयाला लागून असलेल्या नाल्यात गेल्याची दाट शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वन्यजीव अभ्यासकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *