भारताच्या जनतेला वर्षभर दिलासा देणा-या नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन बुधवारी अंदमान-निकोबार बेटावर झाले, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली. गेल्याच आठवडय़ात निकोबार बेटावरील पावसाचा अंदाज हवामान खात्याने जाहीर केला होता.
हवामान खात्याने सांगितले की, मान्सूनचे आगमन योग्यवेळी झाले आहे. त्यामुळे केरळमध्येही गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. केरळात २.५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
मात्र, केरळात पाऊस १ जूनऐवजी ७ जूनमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. गेल्या ४८ तासांत तामिळनाडू व केरळात मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. श्रीलंका, मन्नारच्या आखात व दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा मोठा पट्टा निर्माण झाला आहे.
मान्सून सरकण्यास अनुकूल वातावरण
नैऋत्य मोसमी मान्सून श्रीलंकेच्या पुढे जाण्यास अनुकूल वातावरण आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान बेटे, उत्तर अंदमानचा समुद्र येते तीन ते चार दिवसांत पाऊस सक्रिय होईल. तसेच केरळमध्ये पाऊस वेळेवर येईल, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने दिला आहे.
चेन्नईला पावसाने धुतले
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तामिळनाडूत पावसाने थैमान घातले आहे. या पावसाने चेन्नईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टय़ामुळे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असून ते गुरुवारी अधिक तीव्र होणार आहे, असे हवामान खात्याने सांगितले.
चेन्नईत २५ सेंमीपेक्षा मुसळधार पाऊस पडला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ आंध्र प्रदेशच्या दिशेने जात आहे. हे वादळ आंध्रच्या नेल्लोर शहरापासून १७० किलोमीटर अंतरावर आहे.
हवामान खात्याचे संचालक के. बालचंद्रन म्हणाले की, येत्या २४ ते ४८ तासांत कमी दाबाच्या पट्टय़ाचे रूपांतर चक्रीवादळात होणार आहे. चेन्नईत २३ सेमी, नुंगमबक्कम येथे ८ सेमी, अण्णा विद्यापीठ येथे ७.५ सेमी पाऊस झाला. तामिळनाडू सरकारने सर्व जिल्ह्याधिका-यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. वेल्लोर, अराक्कोणम येथे राष्ट्रीय आपत्कालीन दलाच्या तुकडय़ा तैनात केल्या आहेत.
लंकेत महापूर : ३५ ठार १५० जखमी
कोलंबो- श्रीलंकेतील तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात ३५ जणांचे बळी गेले असून १५० जण बेपत्ता झाले आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून जनजीवन विस्कळीत झाले. श्रीलंकेचे ३०० जवान मदतकार्यात सहभागी झाले आहेत.
लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जयंता जयावीरा म्हणाले की, चिखलातून आतापर्यंत १६ मृतदेह काढले आहेत. अरानायके गावात १५० जण चिखलात गाडले गेले असून तेथे १३ मृतदेह काढले आहेत. अरानायके येथे भूसख्खलन झाले आहे. या गावातील १०४१ जणांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. पोलीस, हवाई दल मृतदेहांचा शोध घेत आहे.
आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राचे प्रवक्ते प्रदीप कोडिपल्ली म्हणाले की, अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. पुरामुळे अनेकांनी घरे सोडून पलायन केले. सिरीपुरा, पाल्लेबागे, ईलगिपित्या या तीन गावांतील २०० कुटुंबे चिखलात गाडली गेली आहेत. या पुराचा मोठा फटका २२ जिल्ह्यांना बसला आहे.
आसाममध्ये दरड कोसळून १० ठार
गुवाहाटी/सिलचर- गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसामच्या करीमगंज व हैलाकंडी जिल्ह्यात दरडी कोसळून १० जण ठार झाले आहेत.
करीमगंज जिल्ह्यात सोनाचिरा येथे दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले. मुसळधार पावसामुळे संपूर्ण घरच दरडीखाली गाडले गेले. मृतांमध्ये पती, पत्नी, मुलगी व दोन मुलांचा समावेश आहे. हैलाकंडी जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या दोन घटना घडल्या. त्यात बैलालपूर येथे चार जण दगावले तर रामचंडी भागात एक सहा वर्षाचा मुलगा मरण पावला, अशी माहिती पोलिसांनी दिली. आसाममध्ये एनडीआरएफ व पोलीस मदतकार्यात जोरदारपणे सामील झाले आहेत.
