हृदयरोग तज्ज्ञ होण्याच्या जिद्दीनं तिनं अभ्यास केला, पण दहावीचं वर्ष सुरु असतानाच ती आजारी पडली. तरीही न डगमगता तिनं आजाराशी मुकाबला करत दहावीची परीक्षा दिली आणि मिळवले तब्बल 92 टक्के गुण, मात्र हे यश पाहायला आज ती या जगातच नाही. ही दुर्दैवी कहाणी आहे पिंपरी-चिंचवडच्या नवी सांगवी भागातील आर्या लगड या विद्यार्थिनीची!
पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवी परिसरात लगड कुटुंब राहाते. दीपक आणि अनुपमा यांच्या आर्या या मुलीचा काल दहावीचा निकाल लागला. त्यांच्या लाडक्या आर्याला 92 टक्के मार्क्स मिळाले, पण तरीही आर्याचे कुटुंबीय उदास आहेत. कारण उत्तुंग यश मिळवून कुटुंबाचं नाव उज्ज्वल करणारी आर्या त्यांना सोडून गेली.
आर्या गेल्या वर्षी एकदा सायकलवरून पडली. त्यानंतर तिच्या शरीरातील पांढर्या पेशींचं प्रमाण अचानकपणे कमी होऊ लागलं. आजारपणाचा मुकाबला करत ती जिद्दीनं अभ्यास करत होती. त्यातच गेल्या वर्षीच्या परीक्षेला ती मुकली. यंदाही आजारपणातच तिनं दहावीची परीक्षा दिली. पण निकालापूर्वीच गेल्या महिन्यात 14 मे रोजी तीचं निधनं झालं.
काल तिचा निकाल लागला. तिला 92 टक्के मार्क्स मिळाले पण स्वतःचं कौतुक पाहायला ती या जगात नाही. तिच्या आठवणीनं तीचं कुटुंब मात्र गहिवरून गेलंय. तिच्या आठवणींनी त्यांना बोलताही येत नाही.
आर्याचा तिच्या शाळेत पहिला नंबर आला आहे. हृदयरोग तज्ज्ञ होण्याचे तिचं स्वप्न होतं. त्यासाठी ती प्रचंड मेहनत घेत होती. त्यासाठी पहिली पायरी असलेल्या दहावीत तीने 92 टक्के मार्क्स मिळवले खरे पण या यशाचा आनंद अनुभवणं तिच्या नशिबात नव्हतं हे मात्र खरं!

