भारतीय बँकांचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याला भारतात परत पाठवण्यास ब्रिटनने नकार दिला आहे. मात्र मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी विनंती केल्यास त्याचा विचार केला जाऊ शकतो, असेही ब्रिटनने म्हटले आहे.
ब्रिटनच्या या भूमिकेमुळे मल्ल्याला भारतात आणून कर्जाची वसुली करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.
मनी लाँडरिंगच्या आरोपावरून मल्ल्याचा पासपोर्टही रद्द करण्यात आला आहे. त्याला भारतात परत पाठवण्याची विनंती भारताने ब्रिटनला केली होती.
त्यावर ब्रिटनचा पंधरा दिवसांनंतर हा निर्णय आला आहे. मल्ल्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहे.
परराष्ट्र प्रवक्ते विकास स्वरूप यानी सांगितले की, १९७१ च्या इमिग्रेशन कायद्यानुसार जोपर्यंत अधिकृत व्हिसा आणि वैध पासपोर्ट आहे तोपर्यंत ते कुणालाही ब्रिटनबाहेर हाकलू शकत नाहीत, असे आम्हाला ब्रिटिश सरकारने सांगितले आहे.
मात्र मल्ल्यावरील आरोपाची माहिती असून तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करु, असेही ब्रिटनने सांगितले आहे, असे स्वरूप यांनी स्पष्ट केले. १९९३ च्या आरोपी प्रत्यार्पण करारानुसार मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण केले जाऊ शकते.