सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत जिभेला आणि पोटाला थंडावा देणारा पदार्थ म्हणजे आइस्क्रीम. लहान-सान असा सर्वाचा आवडता पदार्थ! पण आपण आइस्क्रीम म्हणून जे खातो, ते खरोखर आइस्क्रीम असतं की दुसरंच काही? मध्यंतरी या आशयाचा एक व्हॉट्सअॅप मेसेजही सतत फिरत होता. डालडा वापरून आइस्क्रीम केलं जातं हे सांगून सावध करणारा संदेश होता तो. आणि म्हणूनच गारेगार आइस्क्रीमचा आस्वाद घेताना काही गोष्टी लक्षात असायलाच हव्यात.
आइस्क्रीम असावं कसं?
मुळात आइस्क्रीम हे दुधाचंच असलं पाहिजे. त्यात दुधाच्या क्रीमचं प्रमाण कमीत कमी 10 टक्के असावं असं आपल्या देशाच्या अन्नविषयक कायद्यात नमूद केलेलं आहे. मान्यवर आइस्क्रीम कंपन्या दुधाच्या क्रीमचं प्रमाण साधारणत: 12-13 टक्के ठेवतात. पण अनेक कंपन्या आइस्क्रीम न बनवता ‘फ्रोझन डेझर्ट’ नावानं उत्पादन बनवतात. ‘फ्रोझन डेझर्ट’ म्हणजे थंड (गोठवलेली) मेजवानी! या ‘फ्रोझन डेझर्ट’मध्ये दूध नसतंच. किंवा असलं तरी अगदी अल्प प्रमाणात असतं. त्यात मुख्य पदार्थ असतो, वनस्पतीजन्य चरबी. पाम तेल, सोयाबीन तेल किंवा खोब:याचं तेल यापासून ही वनस्पतीजन्य चरबी तयार केली जाते. वनस्पतीजन्य चरबी हायड्रोजनेटेड ट्रान्स फॅटच्या रूपात असते.
पण फ्रोझन डेझर्ट करतात का?
दुधाच्या क्रीमपेक्षा वनस्पतीजन्य चरबी खूपच स्वस्त असते. म्हणजे दुधाच्या क्रीमचा भाव 400 रुपये प्रतिकिलो असेल, तर वनस्पतीजन्य चरबी असते ती फक्त 50-60 रुपये प्रतिकिलो. शिवाय आइस्क्रीम दुधापासून तयार होत असल्यानं ते टिकवणं जिकिरीचं असतं. वीजपुरवठा पुरेसा नसेल, तर आइस्क्रीम लगेच खराब होऊ शकतं. त्यामानानं फ्रोझन डेझर्ट जास्त काळ टिकतं. त्याचं शेल्फ लाइफ आइस्क्रीमपेक्षा अधिक असतं. आइस्क्रीमची वाहतूक फ्रोझन डेझर्टच्या मानानं कठीण, कारण आइस्क्रीम कायम उणे 20 ते 30 इतक्या कमी तपमानात ठेवावं लागतं. त्यामानाने फ्रोझन डेझर्टला कमी शीतल वातावरण पुरतं. फ्रोझन डेझर्ट निर्मितीची प्रक्रियाही आइस्क्रीमच्या तुलनेने कमी खर्चिक असते. एकंदरच फ्रोझन डेझर्ट तयार करणं, टिकवणं, वाहतूक आणि विक्री आइस्क्रीमपेक्षा स्वस्त व सुलभ असते. आणि खाणारे ग्राहक अजून फार चोखंदळ नाहीत, म्हणून ते फ्रोझन डेझर्टला आइस्क्रीम समजून खातात. त्यांना त्यात काही फार फरक आहे, असं जाणवत नाही.
फ्रोझन डेझर्टमध्ये असलेला हायड्रोजनेटेड ट्रान्स फॅट हा घटक आपल्या शरीराला फारसा उपकारक नाही. अर्थात, म्हणून तो भयंकर वाईटही नाही. मात्र काही जणांना हायड्रोजनेटेड ट्रान्स फॅटचं वावडं असू शकतं. किंवा तो घटक त्यांच्या आरोग्यासाठी त्रासदायक असू शकतो. म्हणून आपल्याला खाण्यापूर्वी माहीत हवं की हे आइस्क्रीम आहे की फ्रोझन डेझर्ट!
आइस्क्रीमची बाजारपेठ खूप मोठी आहे. ती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्न त्यातील 40-50 टक्के हिस्सा हा फ्रोझन डेझर्टनं व्यापलेला आहे.
त्यामुळे, यापुढे आइस्क्रीम खाताना आधी लेबल वाचावं. तो पदार्थ नेमका काय आहे, ते समजून घ्यावं. त्यातील घटक पदार्थ कोणते आहेत यावर नजर फिरवावी आणि मगच त्याचा आस्वाद घ्यावा.
आइस्क्रीम खाताना..
जागरूक ग्राहक म्हणून आपण आइस्क्रीम घ्यायला जातो, तेव्हा त्यावरील लेबल नीट वाचायला शिकलं पाहिजे.
कँडीबार, कप, कोन, फॅमिली पॅक काहीही घेताना ते आइस्क्रीम आहे की फ्रोझन डेझर्ट, हे आपल्याला माहीत करून घ्यायला हवं.
कंपनीनं लेबलवर ते स्पष्ट करणंही बंधनकारक आहे.
आपण कधीतरी मजा म्हणून फ्रोझन डेझर्ट खायला हरकत नाही, पण त्यात हायड्रोजनेटेड ट्रान्स फॅट आहे, दुधाचे क्रीम नाही, याची जाणीव ठेवूनच आणि आपल्याला हे चालणार आहे का याची खात्री करूनच!
थंड पदार्थ रोज किंवा वरचेवर खाण्याची सवय असेल, तर फ्रोझन डेझर्टऐवजी आइस्क्रीम खाणं बरं.
जर लेबलवर आइस्क्रीम किंवा फ्रोझन डेझर्ट असा उल्लेख नसेल तर त्यातील घटक पदार्थाची यादी वाचून ओळखता यायला हवं. ट्रान्स फॅट, प्रोटीन्स, इमल्सिफायर असे उल्लेख असतील तर समजा ते फ्रोझन डेझर्ट असणार.