कुर्ला भाभा रुग्णालयाचे स्थलांतर

कुर्ला भाभा रुग्णालयाचे स्थलांतर

कुर्ल्यातील भाभा रुग्णालयातील विविध विभागांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत घाटकोपर येथील मुक्ताबाई रुग्णालयात प्रसूती विभाग तर शताब्दी रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग हलविण्यात आला आहे.

कुर्ल्यातील भाभा रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याने रुग्णालय बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला होता. परंतु हा निर्णय पालिकेच्या अंगलट आल्यानंतर रुग्णालय बंद करणार नसून दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले होते. त्यानुसार आता रुग्णालयाच्या दुरुस्तीचे कामकाज सुरू झाले असून काही विभाग अन्य रुग्णालयात स्थलांतरितसुद्धा करण्यात आल्याची माहिती भाभा रुग्णालय प्रशासनाने दिली.

भाभा रुग्णालयात मोठय़ा संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयाच्या धोकादायक इमारतीकडे ब-याच वर्षापासून प्रशासनाचे दुर्लक्ष होते. मात्र आता रुग्ण आणि कर्मचा-यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येत आहे. परंतु रुग्णालयाच्या दुरुस्तीचे कामकाज पूर्ण होईपर्यंत रुग्णांना अडचणी येऊ नयेत, म्हणून बाह्यरुग्ण विभाग सकाळी ८.३० ते १२.३० वाजेपर्यंत सुरू असणार आहे. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांवर उपचार करण्यासाठी ४-५ डॉक्टर नेमण्यात आले आहेत. याशिवाय चोवीस तास अपघात विभागाचे कामकाजही सुरू ठेवण्यात आले आहे. इतकेच नाहीतर रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णालयात तीन डॉक्टर रात्रीच्या वेळी कायमस्वरूपी ठेवले आहेत. दरम्यान, एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने अन्य रुग्णालयात हलविण्यासाठी सध्या तीन रुग्णवाहिका असून एक मागविण्यात येणार आहे, अशी माहिती भाभा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप आंग्रे यांनी दिली.

याशिवाय रुग्णालयाच्या स्थलांतराचे कामकाज सुरू झाल्यानंतर दोन दिवसात ८०० ते ९०० जण बाह्यरुग्ण विभागात उपचारांसाठी आले होते. गर्भवती महिलाही नियमित तपासणीसाठी रुग्णालयात येतात. मात्र, प्रसूतीच्या वेळी आम्ही त्यांना मुक्ताबाई रुग्णालयात जाण्यास सांगतो. परंतु अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत आम्ही अन्य रुग्णालयात हलविण्याचा धोका पत्करत नाही. रुग्ण स्थिर असल्याचे पाहून अन्य रुग्णालयात पाठवतो. आतापर्यंत १-२ जणांना हलविण्यात आले आहे, असेही डॉ. आंग्रे यांनी सांगितले.

रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून भाभा रुग्णालय सज्ज

पावसाळ्यात साथीचे आजार बळावण्याची दाट शक्यता असते. आता मुंबईत पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर साथीचे आजार बळावणार यात शंकाच नाही. मुळात कुर्ला विभाग झोपडपट्टय़ांनी वेढला असल्यामुळे मोठय़ा संख्येने साथीच्या आजाराचे रुग्ण भाभा रुग्णालयात दाखल होतात. २०१४-१५ या वर्षात मलेरियाचे ४३६, लेप्टोचे १४, स्वाईन फ्लू ८, हिवताप आणि जुलाबाचे ४४३ रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले होते. परंतु आता रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी विविध विभाग अन्य रुग्णालयात हलविण्यात आल्याने सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णालय प्रशासन सज्ज झाले आहे. साथीच्या आजारांसाठी रुग्णालयात स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला असून ठरावीक डॉक्टरांची येथे नेमणूक करण्यात आली आहे. या विभागात पाच खाटा ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अडचणीच्या वेळा लक्षात घेता आणखीन एका खाटेची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *