दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून लगेचच फेरपरीक्षा घेणार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी सांगितले.
साधारणत: मे च्या अखेर ही परिक्षा घेऊन जून मध्ये त्यांना निकाल देण्यात येईल. ज्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये आणि त्यांना आपली गुणवत्ता सिध्द करण्याची आणखी एक संधी देण्याचे आमचे उदिष्ट असल्याचे तावडे म्हणाले.
यावेळी त्यांनी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. ते केवळ परीक्षेत अयशस्वी आहेत जीवनात अयशस्वी नाहीत. त्यांनी निराश न होता अंगीभूत कौशल्य ओळखून पालकांच्या मदतीने पुढील दिशा ठरवावी.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून पुढील वर्षापासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत निकाल जाहीर करुन अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेचा निकाल लगेचच जून महिन्यामध्ये लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबाबत ही अशा प्रकारची फेर परीक्षा घेता येईल का, याबाबत सध्या विचार सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाने यासंदर्भात कोणता निर्णय घ्यावा हे त्या मंडळावर अवलंबून आहे. असेही तावडे म्हणाले.
राज्यात सोमवारी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत राज्यातील एकूण १४ लाख ३७ हजार ९२२ विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालातही नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली असून तब्बल ९२.९४ टक्के मुली तर ९०.१८ टक्के मुले या परीक्षेत उत्तीर्ण झाली.