मुंबईच्या समुद्र किना-यावर तसेच रस्त्यांवरील घोडागाडीच्या सफरीची मजा आता पर्यटक आणि मुंबईकरांना अनुभवता येणार नाही.
मुंबईत घोडागाडीच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. वर्षभरात मुंबईतील घोडागाड्या बंद कऱण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.
न्यायमूर्ती ए.एस.ओका आणि ए. के.मेनन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. मुंबईतील चालवण्यात येणा-या घोडागाडींच्या वापरावर बंदी आणावी यासाठी स्वयंसेवी संस्थानी याचिका जनहित दाखल केली होती. पेटानेही या प्रकऱणी याचिका दाखल केली होती. या याचिकांवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला.
मुंबईत सुरु असलेली घोडागाडीची सफर ही अनधिकृत आहे. मनोरंजन सफरीसाठी घोडागाडी चालवणे म्हणजे प्राणी रक्षण कायद्याच्या कलम ३ आणिम कलम ११ चे उल्लंघन असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.
दरम्यान, इतर शहरांमध्ये घोडागाडीचा वापर केवळ मनोरंजन सफरीसाठी केला जात असल्याचे आढळल्यास तेथेही बंदीची कारवाई केली जाईल असे न्यायालयाने म्हटले.