‘एफ-१६’ ही लढाऊ विमाने हवी असल्यास तुमच्या पैशातून ती खरेदी करा. आम्ही कोणतेही अनुदान देणार नाही, असे अमेरिकेने मंगळवारी पाकिस्तानला ठणकावले. यामुळे पाकिस्तानला अमेरिकेकडून विमाने मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
अमेरिकेच्या खासदारांनी करदात्यांच्या पैशातून विमान खरेदीसाठी पाकिस्तानला मदत देण्यास विरोध केला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की, अमेरिकेच्या सिनेट सदस्यांनी अमेरिकन करदात्यांचे पैसे पाकिस्तानला देण्यास विरोध केला. पाकिस्तानने स्वत:च्या पैशातून ही विमाने विकत घ्यावीत, असे खासदारांचे म्हणणे आहे.
अमेरिकेचे खासदार व परदेशी संबंध समितीचे प्रमुख बॉब क्रोकर यांनी पाकिस्तानला अमेरिकेच्या पैशातून विमाने देण्यास विरोध केला. तसेच पाकिस्तानने दहशतवाद्यांच्याविरोधात पुरेशी कारवाई केलेली नाही. विमाने हवी असल्यास मे अखेरपर्यंतची मुदत अमेरिकेने पाकिस्तानला दिली आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की, अमेरिकेने या विमानांची पूर्ण मागितलेली किंमत पाकिस्तानला देणे शक्य नाही.