सहा महिन्यांची असताना अर्धांगवायूच्या झटक्यानं ‘ती’ला बहिरेपण आलं. मात्र, लहानपणापासूच कर्णबधिर असतानाही ‘ती’ने मोठी जिद्द बाळगली. बहिरेपणावर मात करत ‘ती’ने शिक्षण तर पूर्ण केलंच, पण, संगीत, सूर, तालावर ‘ती’ने पकडही मिळवली. हीच ती साहसी भरतनाट्यम नृत्यांगना प्रेरणा सहाणे!
भरतनाट्यमचा कलाविष्कार सादर करणारी प्रेरणा कर्णबधीर आहे. ऐकू येत नसतानाही सराईतपणे नृत्य करणं जवळपास अशक्यच. पण प्रेरणाने या अंपगत्वावर मात करत अशा अनेक कलांना आपलंस केलं आहे. तीने चित्रकला, हस्तकलाही जवळ केली आहे.
प्रेरणा 6 महिन्यांची असताना तिला पॅरेलेसिसिचा अटॅक आल्याचं तिची आई सांगते. तिला चालताही येत नव्हतं पण आयुष्याशी तीने सामना केला.
प्रेरणाच्या या संघर्षाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. तिच्या पालकांनीही तिच्या या संघर्षात तिला मोलाची साथ दिली .
प्रेरणा बोलू शकत नाही. पण तिच्या चित्रांमधून ती व्यक्त होत राहते. नृत्यातून तिच्या भावना अधोरेखित करते. तिने केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंमधून ती बोलत राहते.आयुष्यात हार मानलेल्यांना जिद्दीने जगण्याच्या आणि संकटांवर मात करण्याचा संदेश प्रेरणा देते.