अपघातामुळे ‘आयसीयू’त विवाह

लग्नाची सर्व तयारी झाली… लग्नपत्रिकाही वाटून झाल्या… लग्नाला अवघे चारच दिवस उरले होते. तोच काजूपाडयातील प्रदीप मंगल तारवी या नवरदेवाला मोटारसायकलवरुन येतांना अपघात झाला. डोक्याला मार लागल्यामुळे त्याला तातडीने ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लग्न घटीका समीप असतानाही तो स्वत:च्याच विवाहाला उभा राहू शकत नव्हता. अखेर वधू आणि वराकडील मंडळींनी ठरलेले लग्न त्याचदिवशी, त्याचवेळी करण्याचा निर्णय घेतला. फक्त स्थळ बदलले. ते होते वधूच्या घरासमोरील मंडपाऐवजी ठाण्याच्या ‘सिटीझन’ रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग, अर्थात आयसीयू.

प्रदीप तारवी (२४, रा. काजूपाडा, घोडबंदर रोड) या मीरा-भार्इंदर महापालिकेत पाणीपुरवठा विभागात वॉल्व्हमनचे काम करणाऱ्या तरुणाचा विवाह शारदा खांझोडे (२०, रा. खोलांडे, वसई, जिल्हा पालघर) हिच्याशी महिन्यापूर्वी ठरला होता. २७ एप्रिल २०१६ ही लग्नाची तारीख आणि सायंकाळी ६.३० वाजताचा मुहूर्त. सर्व नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या निमंत्रण पत्रिका वाटून झाल्या. त्याच दिवशी प्रदीपचा मोठा भाऊ विकेशचेही लग्न होते. विकेशचा विवाह भिवंडीच्या अंजूरफाटा येथील मंगल कार्यालयात, तर प्रदीपचा विवाह खोलांडे गावात होणार होता…

नवरा मुलगा प्रदीप भार्इंदर येथून त्याच्या दुचाकीवरुन २३ एप्रिलला रात्री आठच्या सुमारास कामावरुन घरी काजूपाडयाकडे येत होता. त्याचवेळी टोलनाक्यापुढे फाऊंटन हॉटेलजवळ चुकीच्या दिशेने आलेल्या नकुल कासार यांच्या कारची त्याला जोरदार धडक बसली. त्याने तो खाली कोसळला. डोक्याला जबर मार लागल्यामुळे मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याचा मित्र लवकेश जाधव आणि इतरांनी त्याला तातडीने घोडबंदर रोडवरील ‘सिटीझन’ रुग्णालयात दाखल केले. बेशुद्धावस्थेतच रुग्णालयात आणलेल्या प्रदीपवर डॉ. मोहन मुरादे पाटील, डॉ. एल. ए. सूर्यवंशी आणि डॉ. फिरोज खान आदींनी उपचार केले. मेंदूमध्ये रक्तस्त्राव आणि मणक्यात फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. आॅॅक्सिजन आणि बीपी मॉनिटरिंग युनिटही लावण्यात आले. २३ ते २६ एप्रिल या चार दिवसात त्याच्या मेंदूची सूज काहीशी कमी झाली. पण तो बोलण्याच्या स्थितीतही नव्हता. लग्नाच्या दिवशी म्हणजे २७ एप्रिलला केवळ उठून बसणे आणि काही अंतर चालणे एवढी सुधारणा झाली…

नवरदेवाला लग्नापुरते वसईला आणून पुन्हा रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता मुलाच्या नातेवाईकांनी डॉ. पाटील यांच्याकडे व्यक्त केली, पण प्रकृती नाजूक असल्यामुळे तसेच मेंदूचा मार आणि मणक्याचे फ्रॅक्चर यामुळे हा धोका पत्करणे चुकीचे होईल, असे सांगत डॉक्टरांनी नवरेदवाला वसईला लग्नासाठी नेण्याची परवानगी नाकारली. मग वधू आणि वराकडील मंडळींनी आयसीयूमध्ये लग्नाची परवानगी मागितली. त्यावर डॉक्टरांनी दहा मिनिटांच्या अवधीत विधी पूर्ण करण्याच्या अटीवर होकार दिला.

लग्नाच्या दिवशीच त्याचा श्वासोच्छ्वास सुधारला. त्याची कृत्रिम आॅक्सिजनची गरज संपली. त्यामुळे सायंकाळी ६.३० वाजता डॉ. मोहन पाटील, डॉ. उद्धव जानोकर, डॉ. एल. ए. सूर्यवंशी आणि डॉ. फिरोज खान तसेच मुलाची आई शालूबाई, भाऊ मधुकर, भावजय रोशनी, वधूचे आई वडील आणि मोजकेच आप्तेष्ट तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. वधू वरांनी एकमेकांना हार घातले. आणि अखेर दोघेही विवाहबंधनात अडकले..

नवरदेवाला दोन

दिवसांत डिस्चार्ज

लग्नाचा इतर कोणताही सोहळा करण्याऐवजी केवळ हार आणि मंगळसूत्र घालण्यात आले. मात्र लग्नाचे विधी नंतर करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रदीपच्या नातेवाईकांनी दिली. त्याला सोमवारी किंवा मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली.

उपचाराचा खर्च नकुल कासारने उचलला…

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या नकुल कासार यानेही पळून न जाता प्रदीपच्या उपचाराची सर्व जबाबदारी स्वत:हून घेतली. त्यामुळे रुगणालयातील त्याच्यावरील उपचाराचा खर्च कासार यांच्याकडून केला जात असल्याचे विकेश तारवी याने सांगितले.

प्रदीपच्या मेंदूजवळ हेमाटोना अर्थात गाठ तयार झाली होती. औषधोपचाराने ही गाठ कमी झाली. पण मणक्यात फॅक्चर होते. अशा अवस्थेत रुग्णाला थेट वसईला नेणे खूपच धोक्याचे होते. त्यामुळे आम्ही त्याला बाहेर नेण्याऐवजी आयसीयूतच लग्नाची परवानगी दिली.

सर्वच तयारी झाल्यामुळे तसेच वधू आणि तिच्या नातेवाईकांसह मुलाच्या नातेवाईकांनीही त्याचदिवशी लग्न करण्याचे ठरविल्यामुळे अखेर आयसीयूत विवाह करण्याचा निर्णय दोघांच्या संमतीने घेण्यात आला. त्यामुळे त्याने बेडवर बसूनच हा वधूच्या गळ््यात वरमाला घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *