लेंडी तलावातील पाणी चोरीला

लेंडी तलावातील पाणी चोरीला

शहरात दुष्काळाची दाहकता दिवसागणिक वाढत असतानाच; लेंडी तलावातून पिण्याच्या आरक्षित पाण्याचीही चोरी अधिका-यांच्या आशीर्वादाने रात्रंदिवस सुरू आहे. पिण्यासाठी पाण्याची तीव्र टंचाई असताना तलावातून जवळपास ७०पेक्षा टक्के अधिक पाणी चोरी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

या तलावातून बेकायदा पाणी चोरी होत असून; या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने श्रीगोंदावासीयांचे हाल सुरू आहेत. श्रीगोंदा शहरालगत लेंडी नाला आहे. यात कुकडीच्या चालू आवर्तनाचे पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले असले तरी हे पाणी खासगी टँकर उपसा करत आहेत.

या प्रकाराकडे पालिका प्रशासन आणि तहसीलदारांचे दुर्लक्ष होत असल्याने तलावातील पाणी चोरी होत आहे. या तलावातून खासगी टँकरने होणारा पाणी उपसा थांबवण्यात पालिकेने कुचराई केली आहे. या ठिकाणी शेकडो खासगी टँकर पाणी उपसा करत आहेत. हे टँकर कुठे जातात, याची पालिकेकडे नोंद नाही.

शहराच्या आसपास असणा-या कूपनलिका आणि शहराला पाणी मिळावे, यासाठी हे पाणी सोडण्यात आले असले तरी प्रत्यक्षात या ठिकाणी अनियंत्रित पाणी उपसा सुरू झाल्याने लेंडी नाल्यातील पाणी किती दिवस या नाल्यात शिल्लक राहील? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *