जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती वधारल्याने देशात पेट्रोल, डिझेल, रॉकेल, गॅस सिलिंडर, हवाई इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी रात्री उशिरा पेट्रोलच्या दरात लिटरमागे १.०६ रुपये तर डिझेलच्या दरात २.९४ रुपयांची वाढ केली.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. त्यातच डॉलर व रुपयाच्या विनिमय दरात होणारे चढ-उतार पाहता या दोन्ही इंधनांच्या दरात वाढ झाली.
केरोसिनच्या दरात तीन रुपयांनी वाढ झाली असून ते ४९.१ रुपया लिटरने मिळणार आहे. तर १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात १८ रुपयांनी वाढ झाली.
दिल्लीत हा सिलिंडर आता ५०९.५० रुपयांऐवजी ५२७.५० रुपयांना मिळेल. तसेच हवाई इंधनाच्या दरात प्रती किलोलिटरमागे ६२७ रुपयांनी वाढ झाली असून ते ४२७८४.०१ रुपयांवर गेले आहे.
या महिन्यातील ही दुसरी दरवाढ आहे. निवडणूक प्रचार काळात वाढत्या महागाईवर भाषण देत असताना प्रत्येक प्रचार सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे दाखले तारखेवार दिले होते.
भाजपाचे राज्य आल्यानंतर पेट्रोल, डिझेलची दरवाढ करू दिली जाणार नाही, अशी आश्वासने त्यांनी जाहीर सभेत दिली होती. प्रत्यक्षात पेट्रोल, डिझेल दरवाढ ही आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीवर अधारित असते हे माहीत असताना काँग्रस राजवटीतील डिझेल दरवाढीवर टीका करणा-या मोदींना आता ही दरवाढ रोखता आलेली नाही.
इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे सामान्य माणसाला पुन्हा महागाईची झळ बसेल, अशी या दरवाढीनंतरची बाजाराची परिस्थिती आहे.