वेगवेगळ्या कारणांमुळे हार्बर मार्गावरील रखडलेली बारा डब्यांची लोकल अखेर शुक्रवारपासून रुळावर उतरणार आहे. तांत्रिक कारणांमुळे ही लोकल आणखी काही महिने धावण्याची शक्यता नसताना अचानक ही गाडी चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
बुधवारी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, बारा डब्यांची लोकल चालवण्यास अवधी लागणार असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले असताना अचानक ही लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वरिष्ठांच्या दबावानंतर ही लोकल घाईघाईने चालवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी वडाळा आणि सॅन्डहर्स्ट रोड स्थानकातील तांत्रिक कामांमध्ये दोष असल्याने हार्बरवरील बारा डब्यांच्या लोकलचा मुहूर्त आणखी तीन ते चार महिने टळण्याची शक्यता होती. मात्र, वडाळा स्थानकातील सिग्नल आणि सॅन्डहर्स्ट रोड स्थानकातील फलाटाचे काम मार्गी लागल्याने आता बारा डब्यांची लोकल धावणार आहे.
त्यानुसार शुक्रवारी सकाळी ६.०० वाजता वाशीहून वडाळाकरता पहिली लोकल रवाना करण्यात येणार आहे. त्यानंतर वडाळा ते पनवेल आणि पनवेल ते सीएसटी अशा लोकलच्या दररोज एकूण १४ फे-या चालवण्यात येणार आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात गाडयांची कमतरता असल्याने केवळ एक लोकल चालवण्यात येत असून येत्या काळात ही संख्या वाढवणार असल्याची माहिती ओझा यांनी दिली.
दरम्यान, यापूर्वी मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेल्या एसी लोकलबाबतही वारंवार तारखा जाहीर झाल्यानंतरही या लोकलची चाचणी होऊ शकली नव्हती. तर हार्बर मार्गावरील बारा डब्यांच्या लोकलबाबतही केवळ पुढील तारखा जाहीर केल्या जात होत्या.
त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाची विश्वासार्हता कमी होत असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने घाईघाईने सुरुवातीला एक लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व लोकल बारा डब्यांच्या झाल्यानंतर हार्बरवरील प्रवासी क्षमता ३३ टक्क्यांनी वाढणार असून याचा मोठा फायदा हार्बरवरील प्रवाशांना होणार आहे.
लोकलच्या १४ फे-या
» वाशी ते वडाळा रोड सकाळी ६.००,
» वडाळा रोड ते पनवेल सकाळी ६.४२
» पनवेल ते वडाळा रोड सकाळी ७.५६,
» वडाळा रोड ते वाशी सकाळी ९.०७,
» वाशी ते सीएसटी सकाळी ९.४३,
» सीएसटी ते पनवेल सकाळी १०.३५,
» पनवेल ते सीएसटी दुपारी १२.०६,
» सीएसटी ते पनवेल दुपारी १.२८,
» पनवेल ते सीएसटी दुपारी २.५७,
» सीएसटी ते पनवेल सायंकाळी ४.२३,
» पनवेल ते सीएसटी सायंकाळी ५.५८,
» सीएसटी ते पनवेल सायंकाळी ७.२०,
» पनवेल ते सीएसटी रात्री ८.४७,
» सीएसटी ते वाशी रात्री १०.१०.