आज मुंबई-कोलकाता आमनेसामने

आयपीएल-९मधील एका महत्त्वपूर्ण लढतीत गुरुवारी (२८ एप्रिल) गतविजेता मुंबई इंडियन्स संघासमोर माजी विजेता कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान आहे. आजी-माजी विजेत्यांमधील ही लढत चुरशीची अपेक्षित आहे.

आयपीएलच्या गेल्या चार मोसमांमधील जेतेपदे मुंबई आणि कोलकात्याने वाटून घेतली आहेत. गौतम गंभीर आणि सहका-यांनी अपयशी सलामीनंतर विजयाचा ‘चौकार’ ठोकत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. गतविजेत्या मुंबईची कामगिरी संमिश्र आहे. पहिल्या सात लढतींमधून तीन जिंकता आल्यात. चार लढतींमध्ये त्यांना पराभव पाहावा लागला. उभय संघ नवव्या हंगामात एकदाच भिडलेत. त्यात मुंबईने कोलकात्यावर मात केली. त्यातच मागील दोन लढतीत ‘होम ग्राउंड’वर त्यांची कामगिरी उंचावली आहे. याचा फायदा रोहित शर्मा आणि सहका-यांना होईल.

मुंबईसह कोलकात्याची भिस्त फलंदाजीवर आहे. त्यामुळे फलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरेल. कर्णधार गंभीर आणि रॉबिन उथप्पाची दमदार सलामी रायडर्सच्या सर्वच विजयांमध्ये महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांना मनीष पांडे आणि सूर्यकुमार यादवची चांगली साथ लाभली. अष्टपैलू युसूफ पठाणसह आंद्रे रसेलची बॅट अद्याप तळपलेली नाही. यजमानांची फलंदाजी कर्णधार रोहित शर्मासह अंबाती रायुडू, पार्थिव पटेलवर अवलंबून आहे. अष्टपैलू कृणाल पंडय़ा तसेच कीरॉन पोलार्ड आणि जोस बटलरने ‘पॅचेस’मध्ये फलंदाजी केलीय.

कोलकात्याची गोलंदाजी तितकी मजबूत नाही. मध्यमगती आंद्रे रसेल, उमेश यादवसह वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल तसेच ऑफस्पिनर सुनील नारायण, ब्रॅड हॉग आणि पियुष चावलाने छाप पाडली तरी सातत्य नाही. गतविजेत्या मुंबईला वेगवान गोलंदाज लसित मलिंगाची अनुपस्थिती जाणवते. मध्यमगती गोलंदाज मिचेल मॅकक्लेनॅघन आणि जसप्रीत बुमराने छाप पाडली असली तरी ऑफस्पिनर हरभजन सिंग, वेगवान गोलंदाज टिम साउदी, मध्यमगती हार्दिक पंडय़ाने निराशा केली आहे.

वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या मोसमातील अंतिम लढत खेळताना सातत्य राखण्यासाठी यजमान प्रयत्न करतील. मात्र मागील पराभवाचा बदला घेण्यादृष्टीने प्रतिस्पर्धी संघ मैदानात उतरेल, हेही नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *