महागड्या गाडीची चैन एका तरुणाला चांगलीच महागात पडली. टेस्ट ड्राइव्हसाठी नेतो असे सांगून ऑडी कार चोरून नेणाऱ्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी गजाआड केले आहे. ज्युबीलंट मोटार वर्क प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑडी शोरुम सूस ब्रिजशेजारी येथे २८ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या हिंजवडी पोलिसांनी प्रतीक भाऊसाहेब भोसले (वय २३, रा. धायरी) याला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ऑडी कार जप्त केली आहे.
याप्रकरणी अरुण अखिलेंद्र (वय २६,रा. हिंजवडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी अखिलेंद्र हे ऑडी शोरुममध्ये काम करत असताना अतुल बलकवडे नावाचा व्यक्ती त्यांच्याकडे आला. त्याने आपल्याला ऑडी कार मॉडेल ए ३ तीन खरेदी करायची असल्याचे सांगितले. टेस्ट ड्राइव्हसाठी टेम्पररी नंबर असलेली कार घेऊन तो गेला. त्याच्या सोबत शोरुमचे सेल्स मॅनेजरला त्याने भारती विद्यापीठ हॉस्पिटल येथे सोडून दिले. त्यानंतर कार घेऊन तो पसार झाला. फिर्यादी यांनी भारती विद्यापीठ स्टेशन येथे फिर्याद दिली. संबंधित आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच गुन्ह्यातील चोरलेली ऑडी कंपनीची डेमो कार त्याने पोलिसांना दिली.

