उन्हाळ्याच्या दिवसात चटपटीत खाण्याच्या नादात फार मसालेदार किंवा तिखट काही खाण्यापेक्षा आंबट-गोड पदार्थ खाणं केव्हाही चांगलंच. आंबट-गोड पदार्थांनी मोठ्यांच्या तोंडाला जशी चव येते तशीच ही चव मुलांनाही खूप आवडते. सध्याचं हवामान आणि मुलांची आवड या दोघांची सांगड घातली तर मुलांची चव आणि आरोग्य जपणारे चविष्ट पदार्थ सहज केले जाऊ शकतात.
चैत्र महिना म्हणजे घरोघरी कैरीची डाळ केली जातेच. कैरीची डाळ करण्यासाठी वेळ बराच लागतो. त्यामुळे घाईच्या वेळेत किंवा मुलांनी मागताच क्षणी ती केली जात नाही. पण कैरीच्या डाळीची तयारी जर व्यवस्थित केली तर कितीही घाई असली तरी कैरीच्या डाळीची मागणी झटक्यात पूर्ण होऊ शकते. असंच करंजांच्या बाबतीतही होऊ शकतं. करंज्यांना किती वेळ लागतो हे वेगळं सांगायला नको. पण ब्रेडची करंजी जशी झटपट होते तशी ती मुलांकडून पटपट संपतेही.
कैरीची (वाटली) डाळ
साहित्य : १ वाटी हरभरा डाळ, पाव कैैरी, २-३ मिरच्या, कोथिंबीर, मीठ, साखर, फोडणीचं साहित्य आणि तेल.
कृती : हरभरा डाळ धुवून थोड्याशा पाण्यात कमीत कमी ४-५ तास भिजवावी. रात्रभर भिजवणार असाल तर डाळ भिजवून फ्रीजमध्ये ठेवावी. कैरी किसून घ्यावी. एक मिरचीचे फोडणीसाठी तुकडे करून ठेवावेत. बाकी दोन मिरच्या आणि डाळ मिक्सरमधे ओबडधोबड वाटून घ्यावी. वाटताना शक्यतो पाणी घालू नये. वाटलेल्या डाळीत कैरीचा कीस, मीठ, साखर घालून मिश्रण ढवळावं. २-३ चमचे तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यात किंचित हळद आणि हिंग घालावा. नंतर त्यात मिरच्या घालून फोडणी ढवळावी. गॅस बंद करावा. फोडणी थोडी थंड झाली की डाळीवर घालावी. डाळ व्यवस्थित हलवून घ्यावी. सर्वात शेवटी डाळीवर कोथिंबीर पेरावी. कैरीची डाळ जर डब्यात द्यायची असेल तर ती डब्यात भरताना अजिबात गरम असायला नको. कधी कधी फोडणीमुळे गरम झालेली डाळ लगेच डब्यात भरली गेली तर ती खराब होऊ शकते.
हाय प्रोटिनयुक्त, चविष्ट अशी आंब्याची/कैरीची डाळ उन्हाळ्यात वरचेवर असायलाच हवी.
ब्रेडची करंजी
साहित्य : १ वाटी खोवलेला ओला नारळ, पाव वाटी साखर, पाव वाटी बारीक चिरलेला खजूर, चिमुटभर वेलची पावडर, १ चमचा काजू-बदामाचे तुकडे, ६-७ ब्रेडच्या स्लाइस, १ चमचा मैदा, तळण्यासाठी तेल किंवा तूप. (प्रत्येकी पाउण वाटी तेल आणि तुपाचं मिश्रणही छान लागतं.)
कृती : नारळात साखर घालून मिश्रण ढवळून ठेवावं. १०-१५ मिनिटांनी जाड बुडाच्या पातेल्यात मिश्रण दोन मिनिटं मोठ्या गॅसवर ठेवावं. नंतर गॅस बारीक करावा. अधून मधून मिश्रण ढवळत राहावं. साखरेचा पाक होऊन मिश्रण सैलसर झालं की वेलची पावडर, काज-ूबदाम, खजुराचे तुकडे घालून मिश्रण ढवळून घ्यावं. मिश्रण थोडं कोरडं वाटलं की गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावं. मैद्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची घट्टसर पेस्ट बनवून ठेवावी. ब्रेडच्या कडा काढून टाकाव्यात. ब्रेड किंचित ओलसर करून घ्यावा. त्यावर मधोमध दोन चमचे सारण ठेवावं. कडांना मैद्याची पेस्ट लावून ब्रेड त्रिकोणी आकारात दुमडून (फोल्ड करून) कडा जुळवून व्यवस्थित दाबून घ्यावं. तयार करंजी लगेच गरम तेला-तुपाच्या मिश्रणात लालसर रंग येईपर्यंत तळून व्यवस्थित निथळूृन घ्याव्यात. करंज्यांचं सारण आदल्या दिवशीही करून ठेवता येऊ शकतं. सारण तयार असलं तर करंजी खूपच झटपट होते. यातल्या सारणाच्या साहित्यात बदल करून आपल्या आवडीच्या विविध प्रकारच्या चवीच्या करंज्याही बनवता येऊ शकतात.