रत्नागिरी हापूसची अमेरिकावारी

रत्नागिरी हापूसची अमेरिकावारी

वाशीतील नवीन रेडिएशन (क्ष किरण) प्लॅंटमधून रवाना झालेला रत्नागिरी हापूस अमेरिकेने विनातक्रार स्वीकारला. गेल्या आठवडाभरात पाच कन्साइन्मेंट अमेरिकेला रवाना झाल्या. त्याद्वारे सुमारे आठ टन आंबा पाठविला आहे. गतवर्षीच्या तुलनेत वीस दिवस आधी अमेरिकावारी सुरू झाली आहे. प्रति डझनाला 26 डॉलर दर मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

हंगामाच्या सुरवातीला निसर्गाने साथ दिल्यामुळे हापूसचे बंपर उत्पादन अपेक्षित होते. त्यादृष्टीने पणन, अपेडा आणि कृषी विभागाने आंबा निर्यातीचे पाचशे टनांचे लक्ष्य निश्‍चित केले. त्यानुसार प्रयत्न सुरू केले; मात्र वातावरणातील बदलामुळे या वर्षी कमी उत्पादनाची शक्‍यता आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात युरोपला आंबा पाठविण्यात आला. त्यानंतर अमेरिकेची तयारी सुरू झाली. वाशी येथे रेडिएशन प्लॅंटचे काम सुरू होते. या नवीन प्लॅंटचे उद्‌घाटन आठ दिवसांपूर्वी झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दीड टनाची पहिली कन्साइन्मेंट विमानाने रवाना झाली. वाशीत प्रथमच प्रक्रिया झालेली असल्याने अमेरिकेत आंबा पोचल्यानंतर तो स्वीकारला जाईल का, याबाबत अपेडासह सर्वच यंत्रणा साशंक होत्या; परंतु आंबा पोचल्यानंतर अमेरिकेत केलेल्या तपासणीत हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

पहिल्या टप्प्यातील दीड टन आंबा विनाअडथळा अमेरिकेच्या बाजारपेठेत विक्रीला गेल्याने भारतीय निर्यातदारांनी तत्काळ पुढील कन्साईन्मेंट पाठविण्यास सुरवात केली आहे. वाशी मार्केटमध्ये प्रतिदिन एक कन्साइन्मेंट पाठविली जात आहे. पुढील चार दिवसांची हवाई यात्रा आरक्षित असल्याचे पुण्याच्या पणन कार्यालयातील निर्यात विभागाकडून सांगण्यात आले. अमेरिकेमधील कृषी अधिकारी डॉ. वेदमलिक यांनीही समाधान व्यक्‍त केले. भारतातून सर्वांत प्रथम पाठविलेल्या रत्नागिरी हापूसला डझनाला 26 डॉलर इतका दर मिळाल्याचे समजते. निर्यातदारांकडून हा दावा केला जात आहे.

युरोप, न्यूझीलंडला 52 टन निर्यात
युरोपला आंबा निर्यात करताना उष्णजल प्रक्रियेच्या निकषांबाबत प्रश्‍नचिन्ह होते, त्यामुळे या वर्षीही बाष्पजल प्रक्रियेचाच वापर केला जात आहे. युरोप आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांत गेल्या पंधरा दिवसांमध्ये 52 टन आंबा पाठविला आहे, तेथेही दर चांगला मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *