अहमदाबादहून मुंबईला येणा-या जेट एअरवेजच्या विमानात बॉम्ब ठेवला असल्याची चिठ्ठी सफाई कर्मचा-याला मिळाल्याने या विमानाचे उड्डाण थांबवण्यात आले. यानंतर या विमानाची श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथकाने कसून तपासणी केली.
मात्र, विमानात बॉम्ब किंवा अन्य कुठलेही स्फोटक साहित्य सापडले नाही. मात्र ज्या ठिकाणी ही चिठ्टी सापडली तेथील प्रवाशाला ताब्यात घेतले असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
तपासणीनंतर संशयास्पद काहीही न आढळल्याने सुमारे तीन तासांनी हे विमान उड्डाणासाठी सज्ज करण्यात आले.
मुंबईहून अहमदाबादला आलेल्या एस२ ४७३८ या विमानाचे बुधवारी सकाळी मुंबईच्या दिशेने प्रस्थान होणार होते. या विमानात १२५ प्रवाशांसह सहा क्रू मेंबर्स होते. मात्र विमानाच्या साफसपाई दरम्यान सफाई कर्मचा-याला एका सीटवर बॉम्ब असल्याचा मजकूर लिहिलेली चिठ्ठी सापडली.
त्याने याची माहिती त्वरीत विमानतळ प्राधिकरणाला दिली. विमानामध्ये बॉम्ब असल्याचा संशयामुळे या विमानाचे उड्डाण तातडीने थांबवून श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथकाला बोलावण्यात आले. या विमानाची कसून तपासणी केली असता विमानात बॉम्ब किंवा अन्य कुठलेही स्फोटक साहित्य सापडले नाही.
या गोंधळामुळे या विमानाचे उड्डाण दोन तास उशीराने झाल्याचे जी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जे. एन. परमार यांनी सांगितले.