पहिली बुलेट धावणार समुद्राच्या पोटातून

मुंबई-अहमदाबाददरम्यान सुरू होणारी पहिली हायस्पीड बुलेट ट्रेन चक्क समुद्राच्या पोटातून धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांना पाण्याखालील प्रवासाचे थ्रिल अनुभवता येईल. या हायस्पीड बुलेट ट्रेन कॉरिडॉरची लांबी 508 किलोमीटर एवढी असून, त्यामध्ये 21 कि.मी. लांबीच्या समुद्राखालील मार्गाचा समावेश असेल, असे रेल्वे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या कॉरिडॉरचा बहुतांश भाग हा उन्नत मार्ग असून, ठाणे आणि विरारदरम्यान ही मेट्रो ट्रेन समुद्राखालून धावेल. या प्रकल्पावर 97,636 कोटी रुपये खर्च केले जाणार असून, यातील 81 टक्के गुंतवणूक ही जपान सरकारची असेल.
या प्रकल्पाची एकून किंमत निर्धारित करताना संभाव्य किंमत, व्याजदरातील वाढ, बांधकाम व आयात शुल्काचाही विचार करण्यात आला आहे. यासाठीची रक्कम ही 50 वर्षांसाठी कर्जाऊ स्वरूपात दिली जाणार असून, तिच्या मुदतीमध्ये आणखी पंधरा वर्षांची वाढ केली जाऊ शकते, अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली. या मेट्रो प्रकल्पासाठी लागणारे रेल्वे इंजिन, डबे, सिग्नल आणि ऊर्जा प्रणालीसाठीचे बहुतांश साहित्य जपानमधून आयात करण्यात येईल. तसा अधिकृत करारदेखील जपानसोबत करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीचे अधिकृत खोदकाम 2018 च्या अखेरीस सुरू होणार आहे. 
विशेष कंपनी 
या प्रकल्पाचा अग्रक्रम लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने “नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड‘ ही विशेष कंपनी स्थापन केली असून, त्यासाठी पाचशे कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. रेल्वे खात्याने दोनशे कोटी रुपये यासाठी दिले असून, महाराष्ट्र आणि गुजरातला प्रत्येकी 25 टक्‍क्‍यांचा वाटा उचलावा लागेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *