तात्या टोपे यांच्या हुतात्मा दिनी त्यांच्या स्मरणार्थ आज नवी दिल्लीत सांस्कृतिक आणि पर्यटन तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या हस्ते 200 रुपये मूल्याचे नाणे आणि चलनात वापरण्यासाठी 10 रुपये मूल्याचे नाणे जारी करण्यात आले. सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव नरेंद्रकुमार सिन्हा या कार्यक्रमाला उपस्थित होते.
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुध्दात तात्या टोपे यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. 7 एप्रिल 1859 रोजी ब्रिटीश सैन्याने त्यांना अटक करुन त्यांच्यावर खटला चालवला आणि 18 एप्रिल 1859 रोजी मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे त्यांना फाशी देण्यात आली. 2015-16 या वर्षात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यशासनाच्या सहकार्याने सांस्कृतिक मंत्रालय तात्या टोपे यांचे द्वीशतकी जयंती वर्ष साजरे करीत आहे. 28 फेब्रुवारी 2016 रोजी महाराष्ट्र शासनाने शनिवार वाड्यात या जयंती वर्षाचा उद्धाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यत्पूर्वी 26 फेब्रुवारीपासून तीन दिवसांच्या शौर्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्रात येवला येथे तात्या टोपे यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारले जात असून, भोपाळमध्येही मध्यप्रदेश सरकारच्या सहकार्याने युध्द संग्रहालय उभारले जात आहे.