‘रामनवमी’निमित्त मुंबईसह देशभरात अयोध्यापती प्रभूरामचंद्र यांचा जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
मुंबईतील मुंबादेवी मंदिरात गुरूवारी मध्यरात्रीपासूनच भक्तांनी मोठी गर्दी केली होती. ‘श्रीरामचंद्र की जय’च्या जयघोषाने मुंबादेवी मंदिराचा परिसर भक्तांच्या आवाजाने अक्षरश: दुमदुमला होता.
राम नवमीनिमित्त सुट्टी असल्याने व लहान मुलांनाही शाळेला सुट्टी पडल्याने ठिकठिकाणचे भाविक मोठ्या संख्येने श्रीरामाच्या दर्शनासाठी मंदिरात आले होते. दुपारी उन्हाच्या झळा सहन होत नसतानाही श्रीरामाच्या दर्शनासाठी हजारो भक्त कडक उन्हात तासनतास उभे होते. तीन-चार तास रांगेत उभे राहिल्यानंतर अखेरीस मंदिराच्या गाभा-यात प्रवेश केल्यावर श्रीरामाच्या मुखदर्शनानंतर भाविकांनी ‘सीयावर रामचंद्र की जय’ अशा जयघोष करण्यात आला.
भाविकांची वाढती गर्दी पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. भजन, किर्तन, श्रीरामाची आरती होऊन हा रामनवमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. दर्शनासाठी येणा-या भाविकांना महाप्रसाद व सरबताचे वाटप करण्यात आले.
शिर्डीतही ‘रामजन्मोत्सव’ साजरा
‘राम नामाचा गजर’ करण्यासाठी मुंबईतील विविध भागांमध्ये विशिष्ट कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. राम नवमी उत्सव दिनानिमित्त गुरूवारी रात्रभर शिर्डीतील साईमंदिर खुले ठेवण्यात आले होते. साईंच्या दर्शनासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी लोटली होती. पंढरपूरप्रमाणे शिर्डीलाही अनेक पायी पालख्या येतात. राज्यभरातून शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. साईनामाचा गजर करत खांद्यावर पालखी घेऊन नाचत गात अनेक भक्त शिर्डीत आल्याने रामनवमी उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. याशिवाय, दिल्लीच्या राम मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. राम नवमीनिमित्त दिल्लीत विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.