रेल्वेमंत्री प्रभूंनी प्रवाशांचा खिसा कापला

रेल्वेमंत्री प्रभूंनी प्रवाशांचा खिसा कापला

रेल्वे अर्थसंकल्पात भाडेवाढीची घोषणा न करणा-या रेल्वेमंत्र्यांनी मागील दारातून रेल्वे प्रवाशांचा खिसा कापला आहे. रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नवीन विशेष गाडय़ांना जादा भाडे ठेवून प्रवाशांना दणका दिला आहे.

यंदा रेल्वेने प्रवासी वाहतुकीची भाडेवाढ केली नाही. मात्र, प्रवाशांसाठी काही गाडय़ा सुरू करण्याची घोषणा केली. या गाडय़ांचे भाडे नेहमीच्या गाडय़ांपेक्षा अधिक असणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-याने दिली.

रेल्वेने ‘हमसफर’, ‘तेजस’ आणि ‘उत्कृष्ट डबल डेकर’ ही वातानुकूलित गाडय़ांची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात केली. या गाडय़ांचे वेळापत्रक बनवण्याचे काम सुरू आहे. मात्र, या गाडय़ांसाठी प्रवाशांना १५ ते ३० टक्के जादा भाडे मोजावे लागेल, असे वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

रेल्वे सुविधा एक्स्प्रेसना डायनामिक भाडे आकारत आहे. या गाडय़ा मागणी असलेल्या मार्गावर चालवण्यात येतात. मागणी वाढल्याप्रमाणे त्याचे भाडे वाढत जाते. ‘हमसफर’ ही वातानुकूलित तृतीय श्रेणीची गाडी आहे. तर ‘तेजस’ गाडी प्रति तास १३० किलोमीटर वेगाने धावेल. तसेच ‘उदय’ ही डबल डेकर असून ती नेहमीच्या गाडीपेक्षा ४० टक्के अधिक प्रवासी वाहून नेईल.

या गाडय़ांमध्ये प्रवाशांसाठी खास सुविधा दिल्याचा दावा रेल्वे अधिका-याने केला. त्यामुळे आम्ही त्याचे भाडे जास्त ठेवले आहे. रेल्वेने ‘महामाना एक्स्प्रेस’ व ‘गतीमान एक्स्प्रेस’ या दोन नवीन गाडय़ा सुरू केल्या. या गाडय़ांचे भाडेही अधिक आहे. प्रवाशांना चांगली सुविधा मिळाल्यास ते अधिक पैसे मोजायला तयार असतात, असे रेल्वे अधिका-याने सांगितले.

ख्रिसमस, छट पूजा, दुर्गा पूजा, कुंभ मेळा आदी उत्सवांच्या वेळी रेल्वे खास गाडय़ा चालवत असते. त्या गाडय़ांचे भाडे अधिक असते, असे रेल्वे अधिकारी म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *