पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्यप्रदेशातील महूमध्ये 14 एप्रिलला सभा होणार आहे. या सभेसाठी प्रत्येकी 100 विद्यार्थी पाठवण्याचा आदेश मध्यप्रदेशातील भाजप सरकारने 200 खासगी महाविद्यालयांना दिला आहे. या आदेशामुळे मोठेच वादंग निर्माण झाले आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महू हे जन्मस्थान आहे. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तिथे मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात या सभेसाठी गर्दी जमवण्याचे मोठेच आव्हान सत्तारूढ भाजपपुढे आहे. अशातच मध्यप्रदेश सरकारकडून इंदूर शहर आणि जिल्ह्यातील महाविद्यालयांना 7 एप्रिलला देण्यात आलेल्या आदेशाचे वृत्त पुढे आले आहे. स्वखर्चाने बसमधून विद्यार्थ्यांना पाठवण्यात यावे. बसबरोबर एका प्राध्यापकालाही पाठवले जावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशावरून विरोधकांनी सत्तारूढ भाजपबरोबरच मोदींनाही टीकेचे लक्ष्य केले आहे.
टीकेमुळे मध्यप्रदेश सरकारला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे. सरकारने नवे पत्र जारी केले असून मूळ आदेशातील विद्यार्थी हा शब्द वगळून त्याजागी स्वयंसेवक असा शब्द टाकला आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही यासंदर्भात सारवासारव करण्यात आली आहे. आदेशातून चुकीचा अर्थ काढण्यात आला. मोठ्या कार्यक्रमांसाठी एनसीसी आणि एनएसएसच्या प्रशिक्षित स्वयंसेवकांची मदत घेतली जाते. पंतप्रधानांच्या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभेच्या व्यवस्थापनासाठी एनसीसी, एनएसएस स्वयंसेवक पुरवण्याचे आवाहन महाविद्यालयांना करण्यात आले आहे. त्यातून वेगळा अर्थ काढला जाऊ नये, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
तुघलकी हुकूम-कॉंग्रेसमध्यप्रदेश सरकारचा आदेश म्हणजे तुघलकी हुकूम आहे. परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना पाठवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मोदींची लोकप्रियता घटत चालल्याचेच त्यातून दिसते. गर्दी जमवण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर केला जात आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसने दिली आहे. तर तरूणाईच्या भविष्याशी भाजपला काही देणे-घेणे नसल्याचे आदेशावरून स्पष्ट होते, असे टीकास्त्र आपने सोडले आहे.
मोदींच्या सभेसाठी प्रत्येकी 100 विद्यार्थी पाठवा, महाविद्यालयांना आदेश

