हंडवारा येथे सुरक्षा जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका क्रिकेटपटूसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर श्रीनगरमध्ये तणाव पसरला आहे. बंदही पुकारण्यात आला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
मिळालेली माहिती अशी की, लष्कराच्या एका जवानाने तरुणीची छेड काढली होती. या घटनेमुळे स्थानिक लोक संतापले होते. संतप्त जमावाने जवानांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात जवानांनी जमावाच्या दिशेने गोळीबार केला. त्यात तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तणाव पसरला आहे. फुटीरतावाद्यांनी बुधवारी बंद पुकारला आहे. दुसरीकडे, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आश्वासन दिले आहे.
काय आहे प्रकरण?
– हंडवारा येथे मंगळवी काही लोकांनी लष्कराच्या एक जवानावर तरुणीची छेड काढल्याचा आरोप केला.
– संतप्त जमावाने दगडफेक केली. इतकेच नव्हे तर लष्कराचे एका बंकरमध्ये जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. यानंतर लष्कराच्या जवानांनी जमावावर गोळीबार केला.
– यात राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या एका क्रिकेटपटूसह तिघांचा मृत्यू झाला.
– नईम कादिर भट असे मृत क्रिकेटपटूचे नाव आहे.
– मृतांमध्ये एका वयोवृद्ध महिलेचा समावेश आहे.
– घटनेचे पडसाद श्रीनगरसह पुलवामामध्ये उमटले. पुलवामामध्ये दगडफेक झाल्याची माहिती मिळाली आहे.
