‘श्री-जान्हवी’ यांच्या घटस्फोटाच्या केसची सुनावणी सुरू

‘श्री-जान्हवी’ यांच्या घटस्फोटाच्या केसची सुनावणी सुरू

‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेतील श्री आणि जान्हवी घटस्फोटाचा निर्णय रद्द करून एकत्र आले असले तरी प्रत्यक्ष आयुष्यात फॅमिली कोर्टात दाखल करण्यात आलेल्या त्यांच्या घटस्फोटाच्या केसची सुनावणी सुरू झाली आहे. फॅमिली कोर्टातील न्यायाधीशांनी त्यांची केस समुपदेशकांकडे पाठविली आहे. फॅमिली कोर्टात शुक्रवारी त्यांच्या घटस्फोट अर्जाची सुनावणी झाली.

प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकरने आपली पत्नी तेजश्री प्रधान-केतकर हिच्यापासून घटस्फोट मिळावा म्हणून पुण्यातील फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केला आहे. शशांकने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला त्या वेळी होणार सून मी या घरची या लोकप्रिय मालिकेमध्येही श्री आणि जान्हवी यांच्या आयुष्यात घटस्फोट होणार असल्याचे कथानक दाखविण्यात येत होते. शशांक आणि तेजश्री यांचा विवाह आठ फेब्रुवारी २०१४ रोजी पुण्यात झाला. या अर्जावर शुक्रवारी कोर्टात सुनावणी झाली. फॅमिली कोर्टात घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर पती- पत्नीमध्ये समेट घडावा तसेच त्यांच्यातील वादाचे निराकारण व्हावे म्हणून केस समुपदेशकांकडे पाठविण्याची तरतूद आहे. त्यानुसार फॅमिली कोर्टातील न्यायाधीशांनी शशांक आणि तेजश्री यांच्या केसमध्ये समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती केली आहे. त्यांची केस संबंधित समुपदेशकाकडे वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या केसची पुढील सुनावणी २६ जुलै रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *