पानसरे खूनप्रकरणी आरोपी समीर गायकवाड आज न्यायालयात हजर करणार

ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ.गोविंदराव पानसरे खूनप्रकरणी आरोपी समीर गायकवाड याच्यावर सोमवारी न्यायालयात दोषारोप निश्‍चितीची प्रक्रिया होणार आहे, या सुनावणीवेळी समीरला न्यायालयात हजर ठेवण्याबाबतचे निर्देश अतिरिक्‍त व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी तपासी अधिकारी तथा अप्पर जिल्हा अधीक्षक एस. चैतन्य यांना दिले आहेत. समीरला न्यायालयात हजर न केल्यास व आदेशाचे उल्लंघन करणार्‍या अधिकार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येईल, असेही न्यायालयाने बजावले आहे.

कॉ. पानसरे खूनप्रकरणी पुरवणी तपासाचा गोपनीय अहवाल तपासाधिकार्‍यांमार्फत गेल्या सोमवारी न्यायालयाला सादर करण्यात आला.  न्यायालयाने तपास पूर्ण झाला का, अशी विचारणा केली. यावर एस. चैतन्या यांनी तपासामध्ये समाधानकारक प्रगती असली तरी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने तपासासाठी आणखी किती कालावधी लागेल हे अद्याप तरी निश्‍चित सांगता येणार नाही, असे न्यायालयात सांगितले आहे. त्यावर तपासाबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्‍त केली होती. त्यानंतर सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर हे न्यायालयात उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे आरोप निश्‍चितीबाबतची सुनावणी तहकूब करावी, अशा मागणीचा अर्ज न्यायालयात सादर केला होता. न्यायालयाने तो अर्ज मंजूर करून पुढील सुनावणी 11 एप्रिलला ठेवली आहे. यामुळे सोमवारी होणार्‍या सुनावणीवेळी तपासी अधिकारी समीरला न्यायालयात हजर करणार की व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधणार, हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *