सरकारी नोकरी मिळण्यासाठी अनेकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करतात मात्र स्पर्धा परीक्षा, मुलाखती देवूनही नोकरी मिळत नाही. मात्र नोकरीसाठी कोणतीही परीक्षा न देता किंवा अर्ज देखील न करता डी.डी.किसान चॅनलमध्ये फिल्ड ऑफिसरची नोकरी मिळाल्याचे नियुक्ति पत्र जिल्ह्यातील एका तरूणास आले आहे. यासाठी १२ हजार ५०० रूपये भरायचे असून त्यानंतर १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या पत्रावर सत्यमेव जयतेची राजमुद्रा व दुरदर्शनच्या किसान चॅलन्सचा लोगो देखील वापरण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, धरणगावचे रहिवाशी भाऊसाहेब दगडू पाटील यांना भारत सरकारच्या सुचना व प्रसारण मंत्रालयव्दार संचलित डी.डी.किसान चॅनलमध्ये क्षेत्रिय अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आल्याचेे कथित बनावट नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे. यासोबत पाच पानांचे माहितीपत्रक व गंभीरबाब म्हणजे नियुक्तीपत्र दिल्यानंतर त्या पदाच्या भरतीचा कोरा अर्ज देखील पाठविण्यात आला आहे. यामुळे हा प्रकार संशयाच्या भोवर्यात अडकला आहे. यातील माहितीपत्रकावरील सुचनांनुसार, प्रशिक्षण झाल्यानंतर २२ हजार ५०० रूपयांचे मासिक वेतन देण्यात येणार आहे. मात्र त्याआधी प्रशिक्षणासाठी १२ हजार ५०० रूपये भरावयाचे आहे. यामुळे हा प्रकार संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. या पत्रांवर राजमुद्रेचाही वापर करण्यात आल्याने गंभीरता वाढली आहे.असे पत्र अनेकांना पाठविण्यात आल्याची चर्चा असून फसवणूकिची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकारावर पोलीसांनी पुढाकार घेवून सत्य समोर आणावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.