मालेगावात तोडफोड आणि जाळपोळ

मालेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या रागातून संतप्त जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली.

शाळेतील स्वच्छता कर्मचा-याने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शाळेत जमा झालेल्या संतप्त पालकांनी शाळेतील फर्निचर बाहेर फेकून आग लावली. तसेच जमावाने पोलिसांची जीप आणि अन्य काही वाहनेही जाळली आहेत. परिसरात तणावाचे वातावरण असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

येथील खातून एज्युकेशन संस्थेच्या मदर आयेशा शाळेत ज्युनिअर केजीमध्ये शिकत असलेल्या एका बालिकेचा शाळेतील स्वच्छता कामगाराने विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी विद्यार्थीनीच्या पालकांनी शाळेत तक्रार करून संबंधित कामगाराला कामावरून काढून टाकण्याची मागणी केली होती. या घटनेला दोन दिवस उलटून गेले तरीही शाळेने काहीही कारवाई केले नसल्याचे पाहून विद्यार्थ्यांचे पालक शाळेत जमा झाले. संतप्त पालक वर्गाने शाळेत तोडफोड आणि नासधूस केली.

यावेळी माजी आमदार रशीद शेख, माजी महापौर मलीक युनूस इसा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर संतप्त जमावाने शाळेतील फर्निचर बाहेर फेकून आग लावली.

यानंतर सदरचे वृत्त मालेगावात पसरले असता या प्रकरणाने रौद्र रुप धारण करीत संतप्त जमावाने पोलिसांची जीप आणि मोटारसायकल पेटवली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात तणावाचे वातावरण असून जिल्हाभरातून पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *