गुढीपाडव्यादिनी बाप्पाचे दर्शन घेणे होणार सोपे

गुढीपाडव्यादिनी बाप्पाचे दर्शन घेणे होणार सोपे

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणा-या गुढीपाडव्यादिनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी होणारी अपेक्षित गर्दी लक्षात घेता ‘सिद्धिविनायक मंदिर’ प्रशासनाने सोय केली आहे. ८ एप्रिल शुक्रवारी म्हणजे गुढीपाडव्यादिनी पहाटे १.३० वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. या दिवशी पहाटेची आणि सायंकाळची आरती आणि मंदिर बंद करण्याच्या वेळा नेहमीप्रमाणे राहतील.

गुढीपाडव्यानिमित्त न्यासाकडून चारचाकी वाहन पूजेसाठी ‘शुभलाभ’ भेट देण्यात येणार असून त्यात सिद्धिविनायकाची प्रतिमा असलेले ११ ग्रॅमचे चांदीचे नाणे, सिद्धिविनायकाची मूर्ती, सिद्धिविनायकाचे वस्त्र, शक्तिविनायक यंत्र, लाडू महाप्रसाद आणि शेंदूर डबी यांचा समावेश असून या वाहन पूजेचे देणगी शुल्क २ हजार १ रु. आहे. तसेच दोनचाकी वाहन पूजेसाठी ‘शुभलाभ’ भेट देण्यात येणार असून त्यात सिद्धिविनायकाचे वस्त्र, शक्तिविनायक यंत्र, लाडू महाप्रसाद, शेंदूर डबी यांचा समावेश असून या वाहन पूजेचे देणगी शुल्क ५०१ रु. आहे. सकाळी ७ ते रा. ८ या वेळेत सिद्धिविनायक मंदिराशेजारील नर्दुल्ला टँक मैदानात ही पूजा पार पडणार आहे.

बाजारात लगबग..

रांगोळीच्या सजावटीसह तो-यात डुलणारी साडी, फुलांची माळ, कडुलिंबाची हिरवीगार डहाळी आणि त्याच्यासोबत साखरेची माळ..साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणा-या गुढीपाडव्याच्या दिनी सर्वत्र हे दृश्य दिसते.

बदलत्या काळानुसार बाजारात रेडीमेड गुढी उपलब्ध असल्या तरी ग्राहकांचा कल पारंपरिक पद्धतीनेच गुढी उभारण्यावर असल्याचे मालाड येथील विक्रेत्याने सांगितले. गुढीपाडव्याला अगदी काही तास शिल्लक असून बाजारात खरेदीसाठी एकच झुंबड उडाली आहे. गुढी उभारण्यासाठी लागणारी काठी, त्याला सजवण्यासाठी लागणारे झेंडूचे हार, तोरण, साखरेची माळ, नवीन साडय़ा खरेदी करण्यासाठी नागरिकांची विशेषत: महिलांची बाजारात लगबग दिसत आहे. दादर येथील प्रसिद्ध फुलांच्या मंडईत फुलांचा बाजार सजला आहे.

आदल्या दिवशी आणि गुढीपाडव्यादिनी पहाटेपासूनच दादर येथील फूल मार्केटमध्ये ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येते. लहान मुलांचे आकर्षण असणा-या साखरेच्या माळा सूर्य, चंद्र, गोलाकार अशा अनेक आकारात बाजारात उपलब्ध आहेत.

सोन्याच्या अलंकाराचा लिलाव

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स. ११ ते सायं. ५ या कालावधीत श्रींच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव केला जाणार आहे. यात श्रीगणेश प्रतिमा, लॉकेट्स, दुर्वा, मोदक, अंगठय़ा, हार आदींचा समावेश आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेल्या अलंकारांपैकी काही अलंकार मंदिराच्या आवारात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *