राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची आक्षेपार्ह व किळसवाणी चित्रफीत सर्वत्र प्रसारित झाली आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड हे डाव्या हातात राष्ट्रध्वज पिशवीसारखा पकडून जात असल्याचे दिसत आहे. एका ठिकाणी तर राष्ट्रध्वजाने तोंड पुसत असल्यासारखे दिसत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी विधानसभेत केला. यावरून झालेल्या गदारोळात विधानसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले. यावर आपण चित्रफीत पाहून निर्णय देऊ, असे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केले.
सोमवारी विधानसभेत राष्ट्रध्वज फडकावण्यात आले यावेळी राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचे सांगून शेलार म्हणाले की, यासंदर्भात जी चित्रफीत फिरत आहे ती आक्षेपार्ह व किळसवाणी आहे. जितेंद्र आव्हाड हे डाव्या हातात राष्ट्रध्वज पिशवीसारखा पकडून घेऊन जात असून, एका ठिकाणी तर राष्ट्रध्वजाला तोंड पुसल्यासारखे दिसते आहेे. सभागृहात हे घडले आहे. याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे.
शेलार यांच्या या मागणीनंतर भाजप व शिवसेनेचे सदस्य आक्रमक होत पुढे आले. सत्ताधारी पक्ष याचे विनाकारण राजकारण करत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.विरोधी पक्षाचे सदस्यही पुढे आले व ते वेलमध्ये उतरले. ‘देशके गद्दारोंको जुते मारो सालोंको’ अशा घोषणा सत्ताधारी सदस्यांकडून दिल्या जात होत्या. तर सत्ताधारी सदस्यांकडून देशके गद्दारोंको असा उच्चार होताच जुते मारो भाजपको असा नारा विरोधकांकडून दिला जात होता. या गदारोळात 10 मिनिटांसाठी अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले. पुन्हा कामकाज सुरू होताच विरोधकांनी पंतप्रधान मोदी परदेश दौर्यावर असताना फडकलेल्या उलट्या राष्ट्रध्वजाची छायाचित्रे सभागृहात दाखविली. यावेळी बोलताना विखे-पाटील यांनी पंतप्रधान परदेश दौर्यावर असताना राष्ट्रध्वज उलटा फडकल्याची घटना घडली. तसेच ते परदेश दौर्यावर असताना राष्ट्रगीत सुरू असतानाही ते पुढे चालत आले. या घटना काही मुद्दाम घडल्या नाहीत, तर त्या अनावधानाने घडल्याचे सांगितले. राष्ट्रध्वजाचा अवमान कोणीही करू शकत नाही, असे सांगितले.