मॅगीपाठोपाठ नेस्लेच्या ‘सेरेलॅक’ व जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या लहान मुलांसाठी असणाऱ्या उत्पादनांवरही संक्रांत येण्याची शक्यता आहे. कोणतेही औषधी तत्त्व नसलेले सेरेलॅक व जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या पावडर, साबण आदी उत्पादनांची विक्री औधषांच्या दुकानातून करण्यास बंदी घालण्यावर केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.
अगदी सामान्य पदार्थापासून बनवलेल्या सेरेलॅकचा उत्पादन खर्च वीस ते चाळीस रुपये असताना ग्राहकांकडून शंभरपट रक्कम उकळली जाते. शिवाय औषधांच्या दुकानात हे उत्पादन उपलब्ध असल्याने त्यास अवास्तव महत्त्व प्राप्त झाले आहे. मॅगीच्या माध्यमातून भारतातील कोटय़वधी मुलांना विष देणाऱ्या ‘नेस्ले’च्या अतिसामान्य उत्पादनांच्या जाहिरातींवर भरसमाट खर्च केला जातो. त्यामुळे सेरेलॅकसारखी उत्पादने महाग मिळतात, असा आक्षेप अहिर यांनी घेतला.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमवेत परदेश दौऱ्यावरून मायदेशी परतलेल्या अहिर यांनी पत्रकारांशी बोलताना ‘नेस्ले’ संदर्भात केंद्राची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, केंद्र सरकार जनेरिक औषधांच्या वापरासाठी देशभरात २०१७ पर्यंत तीन हजार केंद्रे सुरू करणार आहे. या केंद्रांमध्ये सेरेलॅक वा तत्सम उत्पादनांची विक्री केली जाणार नाही.
मॅगीच्या चाचणी मापनाच्या पद्धतीवर नेस्लेने आक्षेप घेतला आहे. त्यावर अहिर म्हणाले की, भारतीय तंत्रज्ञान प्रगत आहे. त्यामुळे मॅगीची चाचणी करण्यासाठी आम्हाला कोणत्याही परदेशी तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही. यापूर्वीदेखील मी नेस्ले व जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या ‘बेबी केअर’ उत्पादनांना लोकसभेत आक्षेप घेतला आहे. ही उत्पादने अत्यंत स्वस्तात बनवली जातात. प्रत्यक्षात अवाच्या सवा किमतीने विकली जातात. त्यावर कुणाचेही बंधन नाही. शिवाय औषधांच्या दुकानात या वस्तू ठेवल्याने त्यांना उगाचच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त होते. परंतु यापुढे ही उत्पादने औषधांच्या दुकानात विक्रीस ठेवता येणार नाही. यासंबंधी केंद्र सरकार मार्गदर्शक तत्त्वे तयार करीत असल्याचे अहिर यांनी स्पष्ट केले.
लहान मुलांचे साबण, सेरेलॅकसारखी उत्पादने औषधांच्या दुकानात विक्रीस ठेवल्याने त्यास विनाकारण महत्त्व मिळते. त्यामुळे सामान्यांची दिशाभूल होते. ही उत्पादने तर किराणा दुकानात व्रिकीस ठेवण्याच्या लायकीची आहेत.

