हमालाच्या मुलाची गरुडझेप, सचिन न्याहारकर 25 व्या वर्षीच न्यायाधीश

हमालाच्या मुलाची गरुडझेप, सचिन न्याहारकर 25 व्या वर्षीच न्यायाधीश

लासलगावमधील कांद्याच्या खळ्यावर हमाली करणाऱ्या एका बापाच्या कष्टाचं आज चीज झालं आहे. परिस्थितीचं भांडवल न करता मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मात करत सचिन न्याहारकर हा हमालाचा मुलगा आता न्यायाधीश झाला आहे.

न्यायाधीश परीक्षेत ओबीसी गटातून राज्यात दुसरा येण्याचा मान सचिन उत्तमराव न्याहारकर याने पटकावला आहे. वयाच्या पंचविशीतच मिळालेल्या या यशामुळे कुटुंबासह गावातील लोक सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ इथे उत्तमराव न्याहारकर यांची एक एकर शेती आहे. मात्र हंमातच पिक घेता येत असल्याने उत्तमराव हे लासलगाव येथे माथाडी कामगार म्हणून काम करतात. सचिनने दहावीपर्यंतचं शिक्षण गावातच घेऊन बारावीपर्यंतच शिक्षण लासलगाव घेतलं. बारावीत चांगले मार्क मिळाल्याने सचिनने पुण्यातील लॉ कॉलेज प्रवेश घेतला. घरातील परिस्थिती नाजूक, आई-वडिलांनी पोटाला चिमटा काढत मुलांच्या शिक्षणात कुठलीच कसूर ठेवली नाही. नातेवाईकांच्या मदतीने पुण्यात पोहोचला आणि तेथे शिकत असतानाच त्याने न्यायाधीशाची परीक्षा दिली.

या परीक्षेसाठी राज्यभरातून 47 हजार विद्यार्थी बसले होते, त्यापैकी दोन हजार 400 विद्यार्थी पास झाले तर 378 जणांना निमंत्रित करण्यात आलं.

अत्यंत जिद्दीने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची न्यायाधीशांची परीक्षा दिली. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, सचिनने राज्यात दहावा आणि इतर मागासवर्गीय गटातून (ओबीसी) दुसरा क्रमांक मिळवला आहे.

दरम्यान आपण सर्वांना सारखा न्याय देऊन प्रलंबित खटले लवकरात लवकर मार्गी लावू यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सचिनने सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *