वाहकाशिवाय धावली एसटी

एसटीत वाहक आहे की नाही याची खात्री करण्यापूर्वीच चालकाने एसटी मार्गस्थ केली. सुमारे 3 कि. मी. च्या प्रवासानंतर काही प्रवाशांनी ही बाब चालकाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर चालकाने एसटी पुन्हा माघारी वळवत ती स्थानकात आणली. तेथे वाहकाला घेवून एसटी पुन्हा मार्गस्थ झाली. मात्र, या प्रकारात सुमारे 1 तासाचा वेळ वाया गेला. याचा नाहक मनःस्ताप मात्र प्रवाशांना सहन करावा लागला.

दोडामार्ग एसटी स्थानकात सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. सावंतवाडी-केर ही एसटी फेरी दुपारी 12.30 वा. च्या सुमारास दोडामार्ग स्थानकात आली. एसटी फलाटला लावून चालक-वाहक स्थानक कार्यालयात गेले. दरम्यान प्रवाशांची चढ-उतारही पूर्ण झाली होती. स्थानक कक्षात नोंद करून चालक आसनावर येवून बसला. दरम्यान कुण्या उत्साही प्रवाशाने बेल वाजविली अन् चालकानेही वाहक आल्याची खातरजमा केल्याशिवाय एसटी मार्गस्थ केली.

दरम्यान तिकीट घेण्यासाठी वाहक न आल्याने काही प्रवाशांनी त्याला शोधले असता एसटीत वाहकच दिसून आला नाही. काही प्रवाशांनी ही बाब चालकाच्या निदर्शनास आणली. तोपर्यंत एसटीने सुमारे 3 कि. मी. चे अंतर कापले होते. अखेर चालकाने ,एसटी दोडामार्ग स्थानकात मागे नेण्याचा निर्णय घेतला. एसटी पुन्हा दोडामार्ग येथे नेण्यात आली. तेथे महिला वाहकाला घेवून एसटी केर गावाकडे रवाना झाली. या सर्व घडामोडीत एक तासाचा वेळ वाया गेला.

याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. काही प्रवाशांनी ही बाब दोडामार्ग वाहतूक नियंत्रकांच्या निदर्शनास आणून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *