आपली बदनामी करते या संशयातून भिगवण येथे एका तरुण विवाहित महिलेस घरात घुसून मारहाण करून रॉकेल अंगावर ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये संबधित महिला गंभीर जखमी झाली असुन, तिच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. यावरून भिगवण पोलिसांनी पती, पत्नीसह इतर चार-पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
भाग्यश्री धनंजय कानतोडे असे गंभीर जखमी महिलेचे नाव असून, तिने स्वत: पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी मदनवाडी येथील सोनाली महेश भोसले व तिचा नवरा महेश भोसले (दोघे रा. मदनवाडी ता.इंदापूर जि.पुणे) व इतर चार-पाच अज्ञातांविरूध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, वरील आरोपी महिलेने काही कारण नसताना तु माझी अब्रु का घालवते अशी मोबाईलवरून भाग्यश्री हिला विचारणा करून शिवीगाळ केली व नंतर सर्वजण मिळून भिगवण येथील प्रभाग तीन मध्ये राहत असलेल्या घरी गेले आणि तिला मारहाण करून रॅाकेल अंगावर ओतून पेटवून दिले. घटनेची माहिती मिळताच बारामतीचे विभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप कोंडे-देशमुख करीत आहेत. जखमी महिलेची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे यादव यांनी सांगितले. सदरची घटना दि.3 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.