जोगेश्वरी रेल्वे स्टेशनवर तैनात असलेल्या एका पोलिसांनी महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. या प्रकाराने संतप्त झालेल्या प्रवााशांनी रेल्वे स्थानकातील पोलीस चौकीची तोडफोड केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला नव्हता. जोगेश्वरी रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्म नंबर 2 च्या रेल्वे ब्रीजखाली पोलीस चौकी आहे. या चौकात कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसाने येथून जाणार्या महिलेची छेड काढली. हा प्रकार प्रवाशांच्या लक्षात येताच प्रवाशांनी पोलिसाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येने प्रवाशी जमा झाल्याचे पाहून पोलीस चौकीचा दरवाजा लावून लपून बसला.
यामुळे संतप्त प्रवाशांनी पोलीस चौकीचा दरवाजा तोडून पोलिसाला मारहाण केली. हा प्रकार स्टेशनवरील रेल्वे अधिकार्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान आलेल्या लोकलमध्ये बसवून या पोलिसाला अंधेरीकडे पाठवले. पिडित महिला आईला स्थानकातून घरी नेण्यासाठी आली होती. महिलेचा पतीदेखील सोबत होता. पोलिसाने महिलेच्या पतीला मारहाण केली. यानंतर महिलेसोबत अश्लिल भाष्य केले. या प्रकारामुळे रेल्वे फलाटावरील प्रवाशांनी पोलिसाला धक्काबुकी केली. तसेच पोलिसाने मद्यपान केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. याप्रकरणी महिलेची तक्रार रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली नव्हती. अशोक माने असे या पोलिसाचे नाव असल्याचे, समजते. नवरा बायकोचे भांडण सोडविण्यास गेलेल्या जोगेश्वरी रेल्वे चौकीतील पोलिसाला मारहाण झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे, अंधेरी रेल्वे पोलिसांनी सांगितले.