मालवणीतून दोन किलो चरस हस्तगत

उत्तरप्रदेशातून दोन किलो चरस घेउन मुंबईच्या मालवणी झोपडपट्टीत विक्रीसाठी आला असता रमेश सोनी (26) यास रविवारी अटक करण्यात आली. मालवणी पोलिसांनी कारवाई केली. आरोपी रमेशकडून अडीज लाख रूपये किमतीचा चरस हस्तगत करण्यात आला.   रमेश उत्तरप्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्याचा रहिवासी आहे.

त्याने याआधीही मुंबईतील अंमलीपदार्थ विक्रेत्यांच्या मागणीनुसार चरसचा पुरवठा केल्याचा संशय मालवणी पोलिसांना आहे. मालवणी पोलीस दोन किलो चरसचा खरेदीदार कोण, हे जाणून घेण्यासाठी रमेशची चौकशी करत आहेत.   मालवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांना मार्वेरोडवरील डिव्हाईन स्कूलशेजारील पालिका मैदानात चरसच्या खरेदी-विक्रीचा सौदा होणार आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक मिलिंद खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली वंगाटे, निरीक्षक लक्ष्मण शिंदे, फौजदार वसंत कांबळे व पथकाने सापळा रचून रमेशला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दोन किलो चरस सापडला. याआधी 23 मार्च रोजी पोलिसांनी मालवणीत हेरॉईन विकणार्‍या मोमीना इब्राहिम हरणेकर या 50 वर्षीय महिलेला अटक केली होती. तिच्याकडे 80 हजार रूपयांचे 60 ग्रॅम हेरॉईन सापडले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *