यंदा गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये नावीन्याची आगळीवेगळी गुढी उभारण्यात येत आहे. शिवाजी पार्कचे आकर्षण आणि शान असणा-या शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. येत्या ६ नोव्हेंबर रोजी पुतळ्याच्या उभारणीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. याचे निमित्त साधत ‘लालबागच्या राजा’चे मूर्तिकार संतोष कांबळी यांनी पुतळ्याला नवीन साज चढवण्याची इच्छा व्यक्त केली.
‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती’तर्फे त्याला रितसर परवानगी मिळाली असून गेल्या आठवडयाभरापासून अंदाजे २० फूट उंच असलेल्या या पुतळ्याला मेटॅलिक ब्राँझ रंग लावण्याचे काम सुरू आहे.
या कामास ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चे सहकार्य लाभले आहे. या परिसरातून ये-जा करताना शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यावर सारखी नजर जायची. महाराजांचा रुबाब, त्यांच्याकडे बघून मनात निर्माण होणारी भावना, आदर अधिक प्रभावी व्हावा यासाठी या पुतळ्याला नवा साज देत मेटॅलिक ब्राँझ रंग देण्याचे ठरवले.
गेला आठवडयाभरापासून मी आणि माझे सहकारी या रंगकामात व्यस्त आहोत. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर हे मोलाचे कार्य पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे, अशा भावना मूर्तिकार संतोष कांबळी यांनी व्यक्त केल्या.

