एअर इंडियाच्या ढिसाळ नियोजनाचे अनेक किस्से आपण ऐकले असतील – स्वतः अनुभवलेही असतील. वैमानिकांचे वाद, तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग, विलंबानं होणारी उड्डाणं, विमानात उंदीर सापडणं, अशा बातम्यांमुळे एअर इंडिया चर्चेत असते. पण बुधवारी याच एअर इंडियाच्या मदुराई-चेन्नई-मुंबई या विमानानं १८ मिनिटं आधी उड्डाण करून दोघांना जीवनदान देण्याचं पुण्यकर्म केलं आणि सगळ्यांची हृदयं जिंकली.
त्याचं झालं असं की, बुधवारी मदुराईत २९ वर्षीय दामोदरनला कार अपघात झाला. मीनाक्षी हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला ‘ब्रेन डेड’ घोषित केलं. त्याच्या कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का होता. पण, तशा परिस्थितीतही आपल्या मुलाचे अवयव दान करण्याची इच्छा पालकांनी व्यक्त केली. त्यानुसार, विविध हॉस्पिटलमध्ये ‘फोनाफोनी’ झाली. एका तरुणाचं हृदय, किडनी, लिव्हर उपलब्ध असल्याचं कळताच चेन्नईच्या हॉस्पिटलनं आपलं एक पथक मदुराईला पाठवलं. पुण्यातील एक ४८ वर्षीय व्यक्ती तीन आठवड्यांपासून त्या हॉस्पिटलमध्ये होती आणि तिच्यावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ‘मस्ट’ होती. त्यामुळे सगळी सूत्रं वेगानं हलली.
एका शरीरातून हृदय काढल्यानंतर ते पुढच्या चार तासांत दुसऱ्या शरीरात बसवावं लागत असल्यानं प्रत्येक सेकंद महत्त्वाचं होतं. सगळीच यंत्रणा झपाटून कामाला लागली होती.
मदुराई ते चेन्नई हा हृदयाचा प्रवास वेगानं व्हावा, यादृष्टीनं वैद्यकीय पथकानं एअर इंडियाशी संपर्क साधला. हृदय आणि लिव्हर घेऊन मदुराईहून तातडीने चेन्नईला जायचं असल्याचा निरोप त्यांना देण्यात आला. तो कळताच, एअर इंडियानं कंबर कसली. हॉस्पिटलचं पथक पोहोचलं की मिनिटाचाही विलंब न करता ‘टेक ऑफ’ करण्यासाठी त्यांनी विमान सज्जच ठेवलं होतं. त्यानंतर, हृदय आणि लिव्हर घेऊन डॉक्टरांचं पथक एअरपोर्टवर पोहोचताच, नियोजित वेळेच्या १८ मिनिटं आधीच एअर इंडियाचं विमान चेन्नईकडे झेपावलं. एअर ट्रॅफिक कंट्रोलनंही विमानाला जराही विलंब होणार नाही, याची खबरदारी घेतल्यानं ते नियोजित वेळेआधी १९ मिनिटं चेन्नईला पोहोचलं.
एअर इंडियानं त्यांचं काम चोख बजावलं होतं. आता पुढची जबाबदारी चेन्नई ट्रॅफिक पोलिसांची होती. हृदयाच्या प्रवासाचा याआधीचा अनुभव गाठीशी असल्यानं त्यांनी ट्रॅफिकचं योग्य नियोजन केलं आणि अगदी वेळेत हृदय आणि यकृत चेन्नईच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलं. तिथे डॉक्टर तयारच होते. त्यांनी आवश्यक सर्व चाचण्या-तपासण्या करून शस्त्रक्रिया सुरू केली आणि पुण्याच्या रुग्णाला हृदय बसवून नवा जन्मच दिला.
या जिकिरीच्या मोहिमेत एअर इंडियानं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याबद्दल, सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव होतोय. दामोदरनच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या सामाजिक जाणिवेलाही दाद दिली जातेय आणि चेन्नईच्या ट्रॅफिक पोलिसांचीही पाठ थोपटली जातेय.

