उन्हाळा म्हटलं की आपल्या चटकदार खाद्य संस्कृतीत वाळवणं आलीच. आता तर घराघरात कुरडया, पापड, सांडगे करण्याची तयारी सुरू झाली असेल. डब्यात थोडं थोडं वाळवणही शिल्लक असेलच. आता ते संपवायचं कसं असा प्रश्नही पडला असेल अनेकींना. काही सूचत नाही म्हणून अशा उरलेल्या वाळवणाची कशीही बोळवण करण्यापेक्षा मुलांसाठी काही चटकदार करता येतं का हे शोधायला हवं. आणि जुन्याचं नवं करण्याची आणि चटपटीत पदार्थानी मुलांना खूश करण्याची हीच योग्य वेळ आहे असं समजा!
कुरडयांचा टेस्टी पास्ता
साहित्य – दोन वाटय़ा कुरडया (चुराही चालेल) मीठ, 2 चमचे तांदूळपिठी, 2 चमचे बटर, 1 लहान चमचा मीरपूड, 1 लहान चमचा मिक्स इटालिअन हर्बज्, 2 चीज क्युब्ज, अर्धा लिटर दूध, तेल आणि 2-3 लसूण पाकळ्या.
कृती- चार वाटय़ा पाणी गरम करावं. त्यात 1 चमचा तेल आणि कुरडया घालून आधी मोठय़ा गॅसवर 2-3 मिनिटं आणि बारीक गॅसवर 2-3 मिनिटं शिजू द्याव्या. गॅस बंद केल्यावर 2 मिनिटं झाकण ठेवावं. नंतर शिजलेल्या कुरडया निथळून घ्याव्यात.
व्हाइट सॉस
कृती- 2 चमचे बटरवर 2 चमचे तांदूळपिठी परतून घ्यावी. खमंग वास यायला लागल्यावर त्यात दूध घालत एकीकडे भराभर ढवळावं. मऊ सॉस तयार झाल्यावर त्यात मीठ, मीरपूड, इटालिअन हर्बज्, अर्ध किसलेलं चीज, 2-3 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या घालून ढवळावं. मिश्रण घट्ट वाटलं तर अजून दूध घालावं. तयार व्हाइट सॉसमधे शिजलेल्या कुरडया घालून ढवळावं. वरून थोडं चीज घालून द्यावं.
हा एकदम ‘इनोव्हेटिव्ह’ प्रकार बनतो. कुरडईसारख्या पारंपरिक पदार्थाना आधुनिक टि¦स्ट दिल्यामुळे मुलांना हा पदार्थ खूप आवडतो. हा पदार्थ जेवढा चटपटीत तितका पौष्टिकही. या पदार्थात मैदा पूर्णपणो वगळला आहे.
शेवयाही अशाच प्रकारे व्हाइट सॉस घालून बनवता येतील. किंवा शेवयांचे भरपूर भाज्या घालूृन नूडल्स बनवता येतात.
शेवयांच्या झटपट व्हेजी नूडल्स
साहित्य- 2-3 वाटय़ा शेवया, प्रत्येकी अर्धी वाटी मिक्स भाज्या, पत्ता कोबी, कांदा, सिमला मिरची, गाजर, मटार, प्रत्येकी 1/2 चमचा बारीक चिरलेला लसूण आणि आलं, प्रत्येकी 2 चमचे सोया आणि टोमॅटो सॉस, 1/2 चमचा चिली सॉस, 2-3 चमचे तेल, मीठ आणि कांद्याची पात
कृती – 4 वाटय़ा गरम पाण्यात 1 चमचा तेल आणि शेवया घालाव्यात. 2-3 मिनिटं मोठय़ा गॅसवर आणि नंतर बारीक गॅसवर शिजू द्याव्यात. थोडय़ा कचरट असतानाच गॅस बंद करून 1-2 मिनिटं झाकून ठेवाव्यात. निथळून घ्याव्यात. पसरट पॅनमधे तेल गरम करावं. त्यात आलं, लसूण परतावं. त्यात शिजलेल्या भाज्या घालून परताव्या.
त्यात शिजलेल्या शेवया, सगळे सॉस आणि मीठ घालून परतावं. मिश्रणाला व्यवस्थित वाफ आली की कांद्याची पात घालावी. नूडल्सचं भांडं गॅसवरून उतरवून ठेवावं.