नाशिककरांनो काळजी घ्या! डेंग्यूचा शहराला डंख, रुग्ण शंभरीपार, ऑगस्टमध्ये 45 बाधित; धूरफवारणी कागदावर

शहर परिसरात पावसाचा जोर थांबला असला, तरी डेंग्यूसह साथीच्या आजारांचा प्रकोप वाढत असल्याचे चित्र आहे. जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूच्या रुग्णांनी शंभरी पार केली असून, ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे ४५ रुग्ण आढळल्याचे चित्र आहे.

डेंग्यूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच नऊ जणांना चिकुनगुन्या, तर १२ जणांना मलेरियाची लागण झाली आहे. त्यामुळे साथीच्या आजारांच्या निर्मूलनासाठी महापालिकेच्या वैद्यकीय पथकांमार्फत जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, घरभेटींद्वारे नागरिकांची तपासणी केली जात आहे. दरवर्षी पावसाळा आला, की डेंग्यू, मलेरियासह साथीचे आजार डोके वर काढतात. पावसाळ्यात यंदाही डेंग्यू, चिकुनगुन्या आणि मलेरियासारख्या कीटकजन्य आजारांचा धोका वाढला आहे.

शहरातील रिकामे प्लॉट, बांधकामस्थळे, बेसमेंट, स्क्रॅप डेपो, टायर दुकाने, तसेच छतावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साचल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. यंदा जूनपर्यंत डेंग्यूची स्थिती नियंत्रणात होती. जानेवारीत ६, फेब्रुवारीत ३, मार्चमध्ये २, एप्रिलमध्ये १, मेमध्ये ३ आणि जूनमध्ये ८ रुग्ण आढळले होते. मात्र, जुलैमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. जुलैमध्ये ३३ रुग्ण आढळले, तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक ४५ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे डेंग्यूची एकूण रुग्णसंख्या १०१ वर पोहोचली आहे.

४५ पैकी १३ रुग्ण सिडकोत

शहरातील डेंग्यू रुग्णसंख्येचा आढावा घेतला असता ऑगस्टमध्ये आढळलेल्या ४५ रुग्णांपैकी सर्वाधिक १३ रुग्ण हे एकट्या सिडको विभागातील आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात धूरफवारणी, फॉगिंग आणि अळीनाशक औषधांची फवारणी केली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक भागांत धूरफवारणी होत नसल्याची तक्रार नगरसेवकांकडून केली जात आहे.

दोनशेवर आस्थापनांना नोटिसा
विविध शासकीय कार्यालये, तसेच बांधकामस्थळांवर तपासणीदरम्यान डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याने कारवाई करण्यात आली आहे. जुलैमध्ये १२०, तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत ८८ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन, सामनगाव, जिल्हा परिषद इमारत (सीबीएस), जिल्हा परिषद नवीन इमारत, नाशिकरोड रेल्वेस्थानक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, भविष्यनिर्वाह निधी कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा सांख्यिकी कार्यालय यांसह शहरातील विविध बांधकाम व्यावसायिकांच्या आस्थापनांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *