शासनाकडून आपत्तीग्रस्त आणि पात्र लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मदत व सानुग्रह अनुदानाच्या वाटपात नियमबाह्य पद्धतीचा अवलंब करून शासकीय निधीचे आर्थिक नुकसान केल्याच्या आरोपाने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तब्बल सहा महिन्यांपासून फरार असलेल्या महिला तलाठ्यास अखेर राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. मंगल रूपचंद दुशिंगे असे अटक करण्यात आलेल्या महिला तलाठ्याचे नाव आहे. माहेगाव येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असताना सन २०२२ ते २०२३ या कालावधीत मदत व पुनर्वसन विभागाच्या अनुदान वाटपात नियमांचे पालन न करता ३ लाख ६५ हजार ३४० रुपयांचे अनुदान वितरित केल्याचे चौकशी अहवालातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मंगल दुशिंगे या माहेगाव येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असताना मदत व सानुग्रह अनुदानाच्या वाटपात अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या चौकशी अहवालात सन २०२२ ते २०२३ दरम्यान ३ लाख ६५ हजार ३४० रुपयांचे अनुदान नियमबाह्य पद्धतीने वितरित केल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि तत्कालीन तहसीलदारांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत केल्यानंतर मंडल अधिकारी विजय बबनराव बेरड यांच्या फिर्यादीवरून एप्रिल २०२६ मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगल दुशिंगे या पोलिसांच्या हाती लागत नव्हत्या. तब्बल सहा महिन्यांपासून त्यांचा शोध सुरू होता. फरार असलेल्या मंगल दुशिंगे अखेर ५ सप्टेंबर २०२६ रोजी राहुरी पोलिसांसमोर हजर झाल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. या अटकेनंतर शासकीय अनुदानाच्या वाटपातील गैरप्रकाराच्या तपासाला वेग आला आहे.
जालन्यातही १२ लाखांच्या अपहाराची चर्चा
मंगल दुशिंगे यांनी जालना जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने १२ लाख २४ हजार ८०२ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे राहुरीतील प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील कथित संगनमत आणि आर्थिक व्यवहारांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव आणि पोलीस नाईक गणेश लिपणे करत आहेत.
