ॲमेझॉनचे मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरून बाजूला उभ्या असलेल्या वाहनांवर आदळून मोठी दुर्घटना घडली आहे. वाहनांना धडकल्यानंतर विमानाला आग लागली आणि विमानतळावर एकच धावपळ सुरु झाली. या दुर्घटनेत किमान पाच जण ठार झाले, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलेली ही दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अधिकाऱ्यांनी, मृत व्यक्ती विमानात होत्या की विमानाने धडक दिलेल्या वाहनांमध्ये होत्या, हे सांगणं खूप घाईचे ठरेल असं म्हटलं.
निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे ‘बोईंग 767’ विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवरून पुढे गेल्याचे आणि विमानतळाच्या परिसरातील गोदामांचे कर्मचारी व इतर व्यावसायिकांकडून वापरल्या जाणाऱ्या बाजूच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर जाऊन आदळल्याचे (आणि उलटल्याचे) दिसून येत आहे
चौकशी सुरू
या दुर्घटनेमुळे विमानतळावरील विमानसेवा बराच वेळ ठप्प झाली होती. विमानतळ प्रशासनाने सर्व धावपट्ट्या (runways) आणि टॅक्सीवेज बंद केले आणि प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी थेट त्यांच्या संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधून माहिती घेण्यास सांगितले.
“शोध, बचाव आणि आग विझवण्याचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी ‘मियामी-डेड फायर रेस्क्यू’चे 60 अग्निशमन वाहने आणि जवळपास 200 कर्मचारी (पुरुष व महिला) घटनास्थळी दाखल झाले,” असे जदाल्ला यांनी सांगितले. “या घटनेचे नेमके कारण ‘एफएए’ (FAA) आणि ‘एनटीएसबी’ (NTSB) द्वारे निश्चित केले जाईल,” असेही त्यांनी नमूद केले. NTSB ने अपघाताची चौकशी करण्यासाठी एका विशेष तपास पथकाला रवाना केल्याचं सांगितलं आहे.
ॲमेझॉनचे निवेदन
ॲमेझॉनने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “विमान लँडिंगचा प्रयत्न करत असताना त्याला एका दुर्घटनेचा सामना करावा लागला.” या घटनेत कोणी जखमी झाले किंवा कोणाचा मृत्यू झाला, याबद्दल त्यात काहीही नमूद करण्यात आलेले नाही.
काय घडले हे समजून घेण्यासाठी आम्ही स्थानिक प्रशासन आणि अधिकाऱ्यांशी मिळून काम करत आहोत असे ॲमेझॉनच्या प्रवक्त्या केली नँटेल यांनी निवेदनात म्हटले आहे.
