नवी मुंबई विमानतळाजवळ मध्यरात्री कॅब थांबवली, ड्रायव्हरचे गैरवर्तन, पनवेलकर महिलेचा गाडीतच विनयभंग

मुंबईतील चेंबूर भागात एका पार्टीला हजेरी लावून पनवेलमधील घरी परतणाऱ्या एका महिला प्रवाशासोबत गैरवर्तन झाल्याचा धक्कादायत प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री उशिरा नवी मुंबई विमानतळाजवळील एका निर्जन रस्त्यावर गाडी थांबवत कॅब चालकाने तिचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळाच्या जवळ घटना

ही घटना नवी मुंबई विमानतळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर एअरपोर्ट सर्व्हिस रोडवर मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली. आरोपीने पाणी पिण्याच्या बहाण्याने टॅक्सी थांबवली आणि नंतर तो मागच्या सीटवर असलेल्या महिलेच्या बाजूला जाऊन बसला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पार्टीनंतर एका मैत्रिणीने टॅक्सी बुक केल्यानंतर पीडिल महिला पनवेल येथील घरी जात होती.

हात धरुन कपडे काढण्याचा प्रयत्न

“कॅब चालकाने निर्जन सर्व्हिस रोड गाडी थांबवली, थोड्या वेळासाठी बाहेर उतरला आणि नंतर पुन्हा गाडीत शिरुन मागच्या सीटवर महिलेच्या बाजूला बसला. त्याने तिचा हात पकडला आणि तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला” असे नवी मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ती महिला कशीबशी स्वतःची सुटका करुन गाडीतून निसटण्यात यशस्वी झाली, त्यानंतर चालक घटनास्थळावरुन पळून गेला.

आरोपीवर गुन्हा, शोध सुरु

घटनेनंतर त्या महिलेने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी ते पनवेल पोलीस ठाण्यात गेले. ही घटना नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे, पनवेल पोलिसांनी तिला संबंधित पोलीस ठाण्यात नेले. तिच्या तक्रारीच्या आधारे, नवी मुंबई विमानतळ पोलिसांनी मोहम्मद अफझल शेख नावाच्या आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी आरोपी कॅब चालकाचा शोध सुरू केला असून, त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी तांत्रिक गुप्तचर यंत्रणेचा वापर केला जात आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. अत्याचाराशी संबंधित प्रकरणांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पीडितेच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी तिची ओळख उघड करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *